(संगमेश्वर / एजाज पटेल)
सुमारे दीड महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देत फरार असलेल्या प्रतिबंधित गुटखा तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपीला अखेर संगमेश्वर पोलिसांनी चिपळूणमधून अटक केली आहे. गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे राबविण्यात आलेल्या या कारवाईमुळे पोलिसांनी बहुचर्चित प्रकरणाचा छडा लावला असून, या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कारवाईची सुरुवात २६ मे २०२६ रोजी झाली होती. संगमेश्वर येथील पारेख पेट्रोल पंपाजवळ संशयास्पदरीत्या उभी असलेल्या एमएच-१४-बीके-४१२० क्रमांकाच्या वॅगनार कारची माहिती पोलिसांना मिळाली होती. संबंधित कारमधून शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा वाहतूक केला जात असल्याचा संशय होता.
दरम्यान, वाहनात तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाने कार घटनास्थळीच लॉक करून अंधाराचा फायदा घेत पलायन केले. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभाग आणि संगमेश्वर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये ५ लाख ४६ हजार ६०० रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू आढळून आला.
या प्रकरणी कार मालक फारुक अल्लारखॉ कच्ची (रा. आंबेड खुर्द, ता. संगमेश्वर) आणि मोहम्मद यासिन उमर फारुक पठाण (रा. मुचरी, ता. संगमेश्वर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते.
फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी संगमेश्वर पोलिसांनी गुप्त माहितीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने सातत्याने तपास सुरू ठेवला. अखेर ९ जुलै २०२६ रोजी मुख्य आरोपी फारुक अल्लारखॉ कच्ची हा चिपळूण परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, पोहेकॉ मनवल आणि पोकॉ आटोळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई करत आहेत. आरोपीला न्यायालयात हजर करून पुढील तपासात आणखी काही धागेदोरे मिळतात का, याकडे लक्ष लागले आहे.

