(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील कोंडये गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी श्री. सागर देसाई यांची पुन्हा एकदा सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीसह सागर देसाई यांनी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची सलग सहाव्यांदा धुरा सांभाळत ‘डबल हॅट्रिक’ पूर्ण केली असून, त्यांच्या नावावर नवा विक्रम नोंदवला गेला आहे.
कोंडये ग्रामपंचायत सभागृहात नुकतीच ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या नवीन अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी माजी सरपंच श्री. सुरेश दसम यांनी अध्यक्षपदासाठी सागर देसाई यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला माजी सरपंच श्रीम. पूनम महेश देसाई यांनी अनुमोदन दिले. सभागृहात उपस्थित ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांनी टाळ्यांच्या गजरात प्रस्तावाला एकमुखाने पाठिंबा देत सागर देसाई यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले.
या ग्रामसभेला महेश देसाई, माजी सरपंच श्रीम. पूनम महेश देसाई, माजी सरपंच श्री. सुरेश दसम, माजी सरपंच श्री. राजाराम पडये, श्री. दीपक शिंदे यांच्यासह ग्रामस्थ आणि ग्रामसेवक उपस्थित होते.
सागर देसाई यांनी यापूर्वी पाच वेळा तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे आणि यशस्वीरीत्या सांभाळली आहे. आता सहाव्यांदा त्यांची निवड झाल्याने त्यांनी अध्यक्षपदाची ‘डबल हॅट्रिक’ पूर्ण केली आहे. गावात निर्माण होणारे छोटे-मोठे वाद, कौटुंबिक तसेच जमिनीशी संबंधित प्रश्न न्यायालयात न नेता ग्रामपंचायत पातळीवर सामोपचाराने आणि निष्पक्षपणे सोडविण्यात त्यांचा नेहमीच महत्त्वाचा वाटा राहिला आहे. गावातील सामाजिक सलोखा आणि ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत ग्रामस्थांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.
सागर देसाई यांच्या या ‘डबल हॅट्रिक’ निवडीबद्दल कोंडये गावासह खाडीभाग दशक्रोशीतून त्यांचे अभिनंदन होत आहे. आगामी कार्यकाळातही कोंडये गाव तंटामुक्त आणि शांतताप्रिय ठेवण्यासाठी त्यांच्या हातून उत्कृष्ट कार्य घडावे, अशा शुभेच्छा उपस्थित लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराने दिल्या.
सागर देसाई यांची प्रतिक्रिया…
“कोंडये ग्रामस्थांनी आणि सर्व ज्येष्ठ मान्यवरांनी माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवून महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. यापूर्वी पाच वेळा ही धुरा सांभाळताना ग्रामस्थांचे सहकार्य आणि मार्गदर्शन नेहमीच पाठीशी राहिले आहे. गावात निर्माण होणारे छोटे-मोठे वाद व मतभेद न्यायालयात न नेता ग्रामपंचायत पातळीवरच सामोपचाराने आणि निष्पक्षपणे सोडवणे, हेच आमचे मुख्य उद्दिष्ट राहिले आहे. सहाव्यांदा झालेल्या या निवडीमुळे जबाबदारी आणखी वाढली आहे. आगामी काळातही संपूर्ण ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोबत घेऊन कोंडये गावातील शांतता, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव कायम राखण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.”

