(रत्नागिरी /प्रतिनिधी)
मुलगा भावाच्या सासरी गेल्याचा राग मनात धरून झालेल्या कौटुंबिक वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची घटना गोळप येथील दाभिळवाडी परिसरात घडली. या वादातून महिलेने स्वयंपाकघरातील धातूच्या फुकणीने तरुणाच्या डोक्यावर सात ते आठ वार केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत विराज विश्वनाथ पावसकर (वय ३६) जखमी झाले असून, याप्रकरणी दाम्पत्याविरुद्ध पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी गौरी गिरीष पावसकर आणि गिरीष शशिकांत पावसकर यांचा मुलगा अनुष हा फिर्यादी विराज पावसकर यांचा भाऊ सुयोग विश्वनाथ पावसकर याच्यासोबत त्याच्या सासरी गोळप-सुतारवाडी येथे गेला होता. याचा राग मनात धरून गिरीष पावसकर हा सुयोगच्या सासरी गेला. तेथे त्याने सुयोग, त्यांचे सासरे संजय वैद्य, सासू शुभदा वैद्य आणि पत्नी भावना यांना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यानंतर आरोपी घरी आल्यानंतर फिर्यादी विराज आणि त्यांच्या भावाला शिवीगाळ करू लागला. त्यातून दोन्ही बाजूंमध्ये झटापट झाली. यावेळी गौरी पावसकर हिने स्वयंपाकघरात जाऊन धातूची फुकणी आणली आणि विराज यांच्या डोक्यावर सात ते आठ वेळा प्रहार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात विराज जखमी झाले.
या प्रकरणी गौरी गिरीष पावसकर (वय ४५) आणि गिरीष शशिकांत पावसकर (वय ४८, दोघेही रा. दाभिळवाडी, पावस, ता. रत्नागिरी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ३५१(३), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पूर्णगड पोलिस करीत आहेत.


