( नवी दिल्ली )
फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने देशातील अनेक मद्य उत्पादक कंपन्यांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. रम, व्हिस्की, व्होडका, बिअर आणि इतर मद्यप्रकारांमध्ये अनधिकृत फ्लेवर्सचा वापर तसेच उत्पादनाच्या वयाबाबत दिशाभूल करणारे दावे केल्याप्रकरणी संबंधित कंपन्यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
एफएसएसएआयने स्पष्ट केले आहे की, कंपन्यांनी नियमांचे उल्लंघन तातडीने दुरुस्त केले नाही, तर अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006 अंतर्गत त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
अनधिकृत फ्लेवर्सच्या वापरावर आक्षेप
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिलेल्या माहितीनुसार, एफएसएसएआयच्या तपासणीत काही कंपन्या व्हिस्की, वाईन आणि इतर मद्यप्रकारांमध्ये नैसर्गिक चव व सुगंध निर्माण करण्यासाठी कृत्रिम (सिंथेटिक) फ्लेवर्सचा वापर करत असल्याचे आढळून आले. नियामकाच्या मते, अशा प्रकारचा वापर केवळ अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन नसून ग्राहकांना उत्पादनाच्या वास्तविक गुणवत्तेबाबत दिशाभूल करणारा आहे.
‘एज्ड’ लेबलिंगवरही कारवाई
एफएसएसएआयने मद्याच्या बाटल्यांवर “Aged”, “8 Years”, “12 Years” अशा वयासंदर्भातील दाव्यांवरही गंभीर आक्षेप नोंदवला आहे. नियमांनुसार, उत्पादनावर नमूद केलेले वय हे त्या मिश्रणातील सर्वात कमी वयाच्या स्पिरिटच्या आधारे असणे आवश्यक आहे. मात्र तपासात काही कंपन्या अत्यल्प प्रमाणात जुने स्पिरिट मिसळून संपूर्ण उत्पादनाला जुने मद्य म्हणून विक्री करत असल्याचे आढळले. एफएसएसएआयने अशा लेबलिंगला दिशाभूल करणारे आणि नियमबाह्य ठरवले आहे.
लेबल दुरुस्त करा किंवा उत्पादने परत मागवा
एफएसएसएआयने संबंधित कंपन्यांना नोटिसा बजावत नियमभंगाबाबत स्पष्टीकरण मागवले आहे. तसेच बाजारात उपलब्ध संबंधित बॅचचे लेबलिंग तातडीने दुरुस्त करण्याचे, किंवा आवश्यक असल्यास संबंधित उत्पादने बाजारातून परत मागवण्याचे (Recall) निर्देशही दिले आहेत.
कठोर कारवाईचा इशारा
एफएसएसएआयने स्पष्ट इशारा दिला आहे की, कंपन्यांचे स्पष्टीकरण समाधानकारक न ठरल्यास अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006 अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल. यात मोठा आर्थिक दंड, परवाना निलंबित करणे किंवा परवाना रद्द करणे यांसारखी कठोर पावले उचलली जाऊ शकतात.
एफएसएसएआयने पुन्हा एकदा स्पष्ट केले की, ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देणे तसेच उत्पादनांबाबत पारदर्शक आणि अचूक माहिती देणे ही उत्पादकांची जबाबदारी आहे. त्यामुळे दिशाभूल करणारे दावे, चुकीचे लेबलिंग किंवा अनधिकृत घटकांचा वापर कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.

