( लोणावळा )
लोणावळा येथील टायगर पॉईंट आणि ड्युक्स नोज परिसरात ट्रेकिंगसाठी आलेल्या 20 वर्षीय तरुणीचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नवी मुंबईहून आलेल्या या तरुणीचा मृतदेह तब्बल 390 फूट खोल दरीतून शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात आला. सकाळी 11.30 वाजता सुरू झालेली रेस्क्यू मोहीम रात्री 9.30 वाजता यशस्वीरीत्या पूर्ण झाली.
श्रेया नरेंद्र पती (वय 20, रा. सीबीडी बेलापूर, नवी मुंबई) असे मृत तरुणीचे नाव आहे. श्रेया ही लॉची विद्यार्थिनी असून ती मुंबईतील नामवंत महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिचे वडील चार्टर्ड अकाउंटंट असून आई गृहिणी आहे.
नेमकं काय घडलं?
31 जानेवारी रोजी श्रेया लोणावळा येथे ट्रेकिंगसाठी आली होती. ड्युक्स नोज परिसरात ती ट्रेकसाठी गेली होती. मात्र संध्याकाळपर्यंत ती घरी परतली नाही. रात्री नातेवाईकांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. लोणावळ्यात चौकशी केली असता ती टायगर पॉईंट परिसरात आल्याची माहिती मिळाली, मात्र परत गेल्याचा ठोस तपशील मिळू शकला नाही.
1 फेब्रुवारी रोजी सकाळी नातेवाईकांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात श्रेयाच्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्याचवेळी टायगर पॉईंट परिसरात सापडलेली बॅग ही श्रेयाचीच असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर तातडीने शोध मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. लोणावळ्यातील काही पर्यटनस्थळांना तिने भेट दिली. त्यावेळी लोणावळा येथील ‘ड्यूक्स नोज’ येथून दुपारी रिक्षाने टायगर पाॅईंट येथे गेली. तेथे एका टपरीजवळ काही जणांना श्रेयाची पिशवी (सॅक) मिळून आली.
390 फूट खोल दरीत आढळला मृतदेह
सकाळी 11.30 वाजता रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. दुपारी 2.30 वाजता शिवदुर्ग रेस्क्यू टीम, पोलीस, डॉग स्क्वॉड आणि ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू झाली. सायंकाळी 4.45 वाजता सुमारे 390 फूट खोल दरीत श्रेयाचा मृतदेह आढळून आला. अत्यंत खोल दरी, धोकादायक भूभाग आणि वाढता अंधार अशा कठीण परिस्थितीत दोरी, स्ट्रेचर, वॉकी-टॉकी आणि लाईटनिंग ड्रोनच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. अखेर रात्री 9.30 वाजता मृतदेह सुरक्षितपणे बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
ही संपूर्ण शोध व बचाव मोहीम पोलीस प्रशासन आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या धाडसामुळे यशस्वी ठरली. या घटनेमुळे लोणावळा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत. तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह हलविण्यात आला. तेथे श्रेया हिचा भाऊ निशांत यांनी मृतदेहाची ओळख पटवली. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
श्रेयाचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या श्वान पथकातील दुर्गा या श्वानाला पाचारण करण्यात आले. पथकातील पोलिस अंमलदार सागर रोकडे यांनी दुर्गा श्वानाच्या मदतीने दरीत शोध सुरू केला. श्रेयाच्या पिशवीतील रुमालावरून दुर्गा श्वानाने माग काढत खोल दरीत मृतदेहाचा शोध घेतला. शिवदुर्ग रेस्क्यू पथकाने मदतकार्य करून मृतदेह दरीतून बाहेर काढला.
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, “श्रेया ही कॉलेजची विद्यार्थिनी होती आणि तिला प्रवासाची खूप आवड होती. मात्र ती वारंवार प्रवास करत असल्याने तिच्या कुटुंबीयांचा त्याला विरोध होता, त्यामुळे ती नाराज असल्याचे सांगितले जाते. ही नाराजी आत्महत्येचे कारण ठरली का, की तिचा मृत्यू अन्य कोणत्या कारणामुळे झाला, याचा आम्ही तपास करत आहोत.”
पोलीस कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराची शक्यता नाकारत नसून, सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. श्रेया लोणावळ्यात एकटीच आली होती की तिच्यासोबत कोणी होते, याचाही शोध घेतला जात आहे. किंवा इतर काही कारणांमुळे तिचा मृत्यू झाला? किंवा काही घातपात आहे का? तिच्या बॅगेत कोणतीही सुसाइड नोट आढळून आलेली नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
तसेच, श्रेयाचा मोबाईल आणि लॅपटॉप पासवर्डने सुरक्षित असल्याने त्यामधून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. हे उपकरणे उघडण्यासाठी तांत्रिक पथक काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
लोणावळा, टायगर पॉईंट आणि ड्युक्स नोजसारख्या ठिकाणी ट्रेकिंग करताना सुरक्षिततेचे नियम पाळावेत, धोकादायक कड्यांच्या जवळ जाणे टाळावे आणि एकट्याने ट्रेकिंग करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

