(विल्ये / अमित कांबळे)
रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती व शिक्षण समिती, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजातील इयत्ता दहावी, बारावी, पदवी तसेच तत्सम परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव समारंभ व करिअर मार्गदर्शन मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आंबेडकरवाडी, रत्नागिरी येथील बुद्ध विहारात आयु. प्रकाश रामचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या कार्यक्रमासाठी करिअर मार्गदर्शक ॲड. राकेश सुनिता तुकाराम सत्वे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण आणि करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष विजय आयरे, सचिव सुहास कांबळे, सहसचिव शशिकांत कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, शिक्षण समितीचे अध्यक्ष जयवंत कदम गुरुजी, सचिव काशिनाथ तांबे गुरुजी, भीम युवा पँथरचे अध्यक्ष प्रितम आयरे, महिला मंडळाच्या अध्यक्षा ऋतुजा आंबुलकर, बौद्धाचार्य तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने शहरातील १९ शाखांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव दरवर्षी करण्यात येतो. तसेच ग्रामीण भागातील १९ शाखांतील विद्यार्थ्यांसाठी बावीस खेडी बौद्धजन संघटना, वाटद-खंडाळा यांच्या वतीने स्वतंत्र गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात येते. यंदाचा हा कार्यक्रम रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी वाटद-खंडाळा येथील दीक्षाभूमी बुद्ध विहारात होणार आहे.
या उपक्रमाचा लाभ विद्यार्थी, पालक तसेच समाजबांधवांनी घ्यावा. तालुक्यातील सर्व गाव शाखांचे पदाधिकारी, महिला मंडळाच्या सदस्यांनी तसेच विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार व सचिव सुहास कांबळे यांनी केले आहे.

