(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
शहरानजीकच्या कुवारबाव-पारसनगर परिसरात आईच्या हातूनच आठ महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सतत रडत असल्याच्या कारणावरून शाहिन आसिफ नाईक (36) हिने आपल्या मुलीच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून व नाक दाबून तिचा गुदमरून मृत्यू घडवून आणल्याची धक्कादायक बाब समोर आली. ही घटना बुधवारी (24 सप्टेंबर) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. ग्रामीण पोलिसांनी शाहिन नाईकला अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
शाहिन नाईक हिचे लग्नानंतर अलोरे (ता. चिपळूण) येथे वास्तव्य होते. मात्र काही दिवसांपूर्वी ती माहेरी कुवारबाव-पारसनगर येथे राहण्यासाठी आली होती. घटनेच्या दिवशी तिचे वडील आजारी असल्याने रुग्णालयात दाखल होते. त्यामुळे घरात कोणी नसताना रडणाऱ्या चिमुकलीचा त्रास झाल्याने शाहिनने संतापाच्या भरात हा टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले.
दरम्यान, सायंकाळी शाहिनची धाकटी बहिण रुग्णालयातून परतली तेव्हा घरात हुरेनचा आवाज न आल्याने तिने शंका घेतली. शाहिनने बाळ झोपल्याचे सांगितले, मात्र बहिणीला संशय आल्याने तिने चिमुकलीला उचलून जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाळाला तपासून मृत घोषित केले. त्यानंतर संपूर्ण घटनेचा उलगडा झाला.
ग्रामीण पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव व सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजस्वी पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

