(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक व योजना विभाग) श्री. किरण लोहार यांची राज्य साक्षरता केंद्र सल्लागार समितीवर राज्यस्तरावर निवड झाली आहे. साक्षरतेच्या क्षेत्रातील त्यांच्या प्रभावी नेतृत्वाची ही दखल मानली जात आहे.
7 मार्च 2024 रोजी योजना विभागाचे शिक्षणाधिकारी पदभार सांभाळत असताना पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय उल्लास नवभारत साक्षरता मेळाव्यात रत्नागिरी जिल्ह्याने केलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल शिक्षणमंत्री यांच्या हस्ते श्री. लोहार यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता.
यानंतर विभाग, जिल्हा, तालुका, केंद्र व शाळा या सर्व पातळ्यांवर उल्लास मेळावा प्रभावी व सुबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे मोठे कौतुक झाले. असाक्षर प्रौढ, वयोवृद्ध नागरिकांना भेटून त्यांच्या अनुभवांची जाण घेत त्यांनी साक्षरता उपक्रमात सर्वसमावेशकता निर्माण केली. शिक्षणाधिकारी स्वतः भेटीस आल्याचा आनंद अनेक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्याच्या सातत्यपूर्ण आणि राज्यातील अग्रेसर कामगिरीच्या आधारे राज्यस्तरावर सल्लागार समिती सदस्य म्हणून श्री. किरण लोहार यांची निवड करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवरील दिल्ली येथे झालेल्या मेळाव्यास राज्याच्या वतीने प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी (जि.प. रत्नागिरी) यांचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारल्यानंतर NIPUN भारत, VBB-Buildathon, SHVR, SQAAF, iGOT, “एक पेड माँ के नाम”, SARAL, UDISE+, MDM–पर्स बाग अशा विविध उपक्रमांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली. यामागे श्री. लोहार यांच्या प्रगल्भ नेतृत्वाचे आणि सूक्ष्म नियोजनाचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
श्री. किरण लोहार यांची ही राज्यस्तरीय निवड रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

