( मुंबई )
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. विधानसभा निवडणुका होऊन सहा अधिवेशनं पार पडली, तरीही सरकारने अद्याप विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती केली नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भास्कर जाधव म्हणाले की, “विधानसभा निवडणूक होऊन सहा अधिवेशनं झाली, तरी सरकारने विरोधी पक्षनेता नेमलेला नाही. याची सरकारला लाज वाटली पाहिजे आणि विधानसभा अध्यक्षांनाही याचा खेद वाटला पाहिजे.”
यावेळी त्यांनी अधिवेशनाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या मते, या अधिवेशनातून सर्वसामान्य जनतेला कोणताही ठोस दिलासा किंवा निर्णय मिळालेला नाही. पूरस्थिती, कायदा व सुव्यवस्था यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असतानाही संबंधित मंत्री किंवा सरकारचा प्रतिनिधी सभागृहात उपस्थित नसतो, असा आरोप त्यांनी केला. सरकार गंभीर चर्चा टाळत असून स्वतःच्या कामगिरीचं कौतुक करण्यातच व्यस्त आहे. जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी सरकार स्वतःला वेगळं आणि यशस्वी दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
याशिवाय विरोधी पक्षाच्या आमदारांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, सभागृहात विरोधी पक्षाच्या आमदारांना पुरेसा वेळ दिला जात नाही. इतकेच नव्हे, तर विकासकामांसाठीचा निधीही विरोधी आमदारांना मिळत नाही. कोणत्या विभागातून कोणत्या आमदाराला किती निधी मिळाला याची माहिती तपासली, तर विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी नाकारण्यात आल्याचे स्पष्ट होईल. हीच या सरकारची कार्यपद्धती आहे,” असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित भेटीबाबत विचारण्यात आले असता, भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. “त्या भेटीबाबत मला कोणतीही माहिती नाही. तसेच संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरही मी भाष्य करणार नाही. ते आमचे वरिष्ठ नेते आहेत आणि पक्षातील शिस्तीनुसार त्यांच्या वक्तव्यावर बोलणे योग्य ठरणार नाही,” असे ते म्हणाले.

