(रत्नागिरी)
भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील मौजे टेरव बु. या गावाने उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मतदार यादीचे १०० टक्के पुनरीक्षण पूर्ण करणारे हे राज्यातील पहिले गाव ठरले असून, जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या विशेष मोहिमेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी घरोघरी भेटी देऊन मतदारांची माहिती पडताळून पाहत संपूर्ण प्रक्रिया अचूक आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण केली.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनुज जिंदल यांच्या नेतृत्वाखाली, २६५-चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली टेरव बु. गावाची या विशेष मोहिमेसाठी निवड करण्यात आली होती. चिपळूणचे तहसीलदार प्रवीण लोकरे आणि निवडणूक नायब तहसीलदार रसिका रसाळ यांनी संपूर्ण मोहिमेवर प्रभावी देखरेख ठेवली.
गावात एकूण १९५ मतदार असून त्यामध्ये ९३ महिला आणि १०२ पुरुष मतदारांचा समावेश आहे. सर्व १९५ मतदारांना गणना प्रपत्र (EF) वितरित करण्यात आले. त्यापैकी १८७ प्रपत्रांचे मोबाईल ॲपद्वारे यशस्वी डिजिटायझेशन करून ऑनलाइन नोंदणी करण्यात आली.
उर्वरित ८ प्रपत्रे ‘अनकलेक्टेबल’ म्हणून वर्गीकृत करण्यात आली. त्यामध्ये २ मयत मतदार, ५ दुबार नोंदणी असलेले मतदार आणि १ कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार आढळून आले. त्यानुसार कायदेशीर प्रक्रियेची अंमलबजावणी करून मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यात आली.
या यशस्वी मोहिमेत सुप्रिया लोखंडे (तलाठी तथा BLO), आस्माकौसर राजअहमद देसाई (पर्यवेक्षक), नारायण चौधर (मंडळ अधिकारी), मधुरा विश्वनाथ साळवी (अंगणवाडी सेविका), सुहास मोहिते (पोलीस पाटील), शुभम उतेकर (ग्राम महसूल अधिकारी), अनिकेत शिर्के (महसूल सहाय्यक, निवडणूक शाखा) तसेच ग्रामपंचायत टेरव बु.च्या संपूर्ण पथकाने अहोरात्र परिश्रम घेतले.
टेरव बु. गावाने राज्यात प्रथम १०० टक्के पुनरीक्षण पूर्ण करून आदर्श निर्माण केला असून, या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थ आणि संपूर्ण निवडणूक यंत्रणेचे विशेष अभिनंदन केले आहे.

