(कोल्हापूर / वृत्तसंस्था)
जयसिंगपूरजवळील दानोळी गावात १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सराईत गुन्हेगार महेश दळवी याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे दानोळी आणि जयसिंगपूर परिसरात खळबळ उडाली असून, हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी हा हल्ला कोणत्या कारणातून केला, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
दानोळी-जयसिंगपूर मार्गावरील चांदोली वसाहतीजवळ ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी महेश दळवी यांच्यावर गोळ्या झाडल्या. या भरदिवसा झालेल्या हल्ल्यामध्ये महेश दळवी गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या दळवी यांना त्यांच्या नातेवाइकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेनंतर परिसरात धावपळ उडाली.
गोळीबाराची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. महेश दळवी हा सराईत गुन्हेगार असून तो स्थानिक राजकारणातही सक्रिय सहभाग घेत होता. दळवी याच्यावर गोळीबार करणारे हल्लेखोर कोण आहेत, हत्येमागे नेमके काय कारण आहे आणि या घटनेशी संबंधित अन्य काही बाबी आहेत का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेण्यासह प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चेत आला आहे. नुकतेच माणगाव येथे एका १३ वर्षीय मुलीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर काही तासांतच महेश दळवी याच्या हत्येची घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये चिंता आणि संताप व्यक्त केला जात आहे. दानोळी परिसरात घडलेल्या गोळीबारामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, हल्लेखोरांचा शोध आणि हत्येमागील कारणांचा उलगडा होण्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


