( मुंबई )
राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या (DCC Bank) शिपाई भरती प्रक्रियेत महाराष्ट्र सरकारने मोठे बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार चतुर्थ श्रेणीतील शिपाई पदाची ऑनलाइन भरती बंद करण्यात आली असून भरती प्रक्रिया आता ऑफलाइन पद्धतीनेच राबवली जाणार आहे. तसेच संबंधित जिल्ह्यातील स्थानिक युवकांना 100 टक्के प्राधान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने यासंदर्भातील सुधारित परिपत्रक जारी केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने, स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिक संधी मिळाव्यात या उद्देशाने भरती नियमांमध्ये बदल करण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
भरती प्रक्रिया कशी असेल?
नव्या नियमानुसार शिपाई पदाची भरती संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ऑफलाइन पद्धतीने केली जाईल. लेखी परीक्षा अनुभवी आणि तज्ज्ञ संस्थेमार्फत घेणे बंधनकारक असेल. भरती प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार झाल्यास संबंधित बँकेच्या संचालक मंडळावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही सहकार विभागाने दिला आहे.
गुणपद्धती आणि पात्रता
सुधारित नियमांनुसार शिपाई पदासाठी:
- लेखी परीक्षा – 70 गुण
- मुलाखत – 30 गुण
- किमान शैक्षणिक पात्रता – 12 वी उत्तीर्ण
उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता, लेखी परीक्षेतील कामगिरी आणि मुलाखतीतील सादरीकरण या निकषांवर केली जाणार आहे.
स्थानिक उमेदवारांना प्रथम प्राधान्य
स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील उमेदवारांना 100 टक्के प्राधान्य देण्यात येणार आहे. मात्र, आवश्यक संख्येने पात्र स्थानिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास उर्वरित पदे जिल्ह्याबाहेरील पात्र उमेदवारांमधून भरता येणार आहेत. यासाठी 22 जून रोजी जारी करण्यात आलेले परिपत्रक रद्द करण्यात आले असून, नव्या सुधारित नियमांनुसार राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये शिपाई भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

