( पुणे )
शहरातील पर्वती दर्शन परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. आजारी आईच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे दोडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. मंदा दोडके (वय 50) आणि त्यांचा मुलगा साहिल गणेश दोडके (वय 25) हे पर्वती दर्शन परिसरात वास्तव्यास होते. मंदा दोडके या ज्येष्ठ नागरिकांची सेवा करण्याचे काम करत होत्या, तर साहिल विविध कामे करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होता.
उपचारादरम्यान आईचे निधन
गुरुवारी पहाटे मंदा दोडके यांना अर्धांगवायूचा तीव्र झटका आला. त्यानंतर साहिलने त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, आईच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतर साहिलला मोठा मानसिक धक्का बसला. त्यानंतर त्याचाही मृत्यू झाला.
साहिल हा चार बहिणींनंतर झालेला एकुलता एक मुलगा होता. घरची आर्थिक परिस्थिती कठीण असतानाही तो विविध कामे करून कुटुंबाला आधार देत होता. साहिल पहाटे उठून लोकांच्या घरी दुधाच्या पिशव्या टाकून लिफ्ट दुरुस्तीची कामं करत होता. मंदा दोडके यांना गुरुवारी पहाटे अर्धांगवायूचा तीव्र झटका आला आणि तेव्हा साहिलने त्यांना उपचारासाठी तातडीनं संसून रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान त्याच्या आईचं निधन झालं. आईवर त्याचे विशेष प्रेम असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेनंतर माय-लेकरांवर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेदरम्यान अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

