(रत्नागिरी)
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या प्रायोजकत्वाखाली गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आयोजित ‘झेप’ सांस्कृतिक महोत्सवात यंदा संगीत विभागाने सर्वांगीण कामगिरी करत ओव्हरऑल चॅम्पियनशिपसाठीचा फिरता आर.ई.एस. करंडक आणि महाराजा करंडक जिंकला. ओव्हरऑल विजेत्या विभागाला करंडकासह १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
विद्यार्थ्यांमधील कौशल्यविकासाला चालना देण्यासाठी ‘झेप’ महोत्सवात नाट्य, नृत्य, वाङ्मय, संगीत, फाइन आर्ट्स, फॅशन आणि उद्योजक असे सात विभाग कार्यरत आहेत. या विभागांमधील विद्यार्थी इव्हेंट मॅनेजमेंटची संपूर्ण जबाबदारी सांभाळत महोत्सवाचे नियोजन करतात. सर्व विभागांचा सक्रिय सहभाग वाढावा आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने आर.ई.एस. करंडक सुरू केला आहे.
यंदा संगीत विभागाने प्रथम क्रमांक पटकावत आर.ई.एस. करंडक आणि महाराजा करंडक आपल्या नावावर केला. द्वितीय क्रमांक नृत्य विभागाला, तर तृतीय क्रमांक उद्योजक विभागाला मिळाला.
इव्हेंट मॅनेजमेंटचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून समजावे, या उद्देशाने १९९५ च्या महाराजा ग्रुपमधील ११ मित्रांनी २००५ मध्ये महाराजा करंडक सुरू केला. यंदा या करंडकाला २० वर्षे पूर्ण झाली. सुरुवातीच्या काळात इव्हेंट मॅनेजमेंटवर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आणि हळूहळू विद्यार्थ्यांमध्ये या स्पर्धेबाबत उत्सुकता व स्पर्धात्मक भावना निर्माण झाली. आज ‘झेप’ महोत्सव केवळ कला सादरीकरणापुरता न राहता इव्हेंट मॅनेजमेंटची व्यावहारिक सिस्टीम म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
यंदा संगीत विभागाने सादर केलेला चार तासांचा कार्यक्रम विशेष ठरला. एकेरी आणि दुहेरी गायन स्पर्धांबरोबरच बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स विभागातील संगीत शाखेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एक तासाच्या मैफिलीने प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाला कश्मिरा सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. सादरीकरणाची गुणवत्ता, नियोजन आणि सुसूत्रता यामुळे संगीत विभागाने महाराजा करंडकावर आपली मोहोर उमटवली.
या प्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, माजी उपप्राचार्य डॉ. यास्मिन आवटे, ‘झेप’ समन्वयक व सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर, विद्यार्थी सचिव सुमित पाध्ये, सांस्कृतिक प्रतिनिधी प्रसिद्धी सोनवणे तसेच महाराजा ग्रुपचे सदस्य राजेश जाधव आणि संदेश कीर उपस्थित होते.

