(रत्नागिरी / वार्ताहर)
तोणदे, हातीस, टेंबे, पोमेंडी आणि सोमेश्वर या पंचक्रोशीतील नागरिकांना महावितरणच्या कथित ढिसाळ नियोजनाचा फटका बसत असून पावसाळा सुरू झाल्यापासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना रात्रभर अंधारात राहण्याची वेळ येत आहे. एकीकडे महावितरणकडून स्मार्ट प्रीपेड आणि पोस्टपेड मीटरची सक्ती केली जात असताना, दुसरीकडे दर्जेदार वीजपुरवठा देण्यात मात्र अपयश आल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, तीन वर्षांपूर्वी याच प्रश्नावर मोठा मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी संबंधित भागातील ११ केव्ही वीजवाहिनी भूमिगत करण्याचे आश्वासन महावितरणने दिले होते. मात्र, निधीअभावी काम रखडल्याचे कारण देत हा प्रस्ताव अद्यापही प्रत्यक्षात आलेला नाही. परिणामी, दर पावसाळ्यात हजारो वीजग्राहकांना वारंवार वीजखंडित होण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांनी कुरतडे-तोणदे ११ केव्ही वीजवाहिनी जोडून ‘रिंग रूट’ तयार करण्याची तसेच काजळी नदीकिनारी जाणारी टेंबे-हातीस ११ केव्ही वीजवाहिनी रस्त्यालगत स्थलांतरित करण्याची मागणी अनेकदा केली आहे. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांचा रोष प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे लाईनमन आणि कनिष्ठ अभियंत्यांवर निघत असल्याची खंतही व्यक्त करण्यात येत आहे. यावर्षी केवळ वादळी वाऱ्यामुळेच नव्हे, तर जोरदार पाऊस झाला तरी ११ केव्ही वीजवाहिनी वारंवार ट्रिप होत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
सततच्या वीजखंडितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास महावितरण कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

