(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाळूपासून भव्य पोर्ट्रेट साकारत अनोखी मानवंदना अर्पण केली आहे.
आज (१४ एप्रिल) रोजी साजऱ्या होणाऱ्या जयंतीनिमित्त रहाटे यांनी समुद्रातील वाळूचा वापर करून ही आकर्षक चित्रकृती उभी केली. विशेष म्हणजे रत्नागिरी परिसरातील पांढरी वाळू आणि भाट्ये बीचवर आढळणारी काळी वाळू वापरून केवळ दोन तासांत त्यांनी हे प्रभावी पोर्ट्रेट साकारले. या कलाकृतीतून त्यांनी महामानवाच्या कार्याला सर्जनशील अभिवादन केले असून, स्थानिक स्तरावर या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे.
गतवर्षीही रहाटे यांनी पिंपळाच्या पानावर डॉ. आंबेडकरांची अत्यंत सूक्ष्म रांगोळी साकारत वेगळा विक्रम नोंदवला होता. यंदाही त्यांच्या या नाविन्यपूर्ण सादरीकरणामुळे कला आणि सामाजिक भावनेचा सुंदर संगम पाहायला मिळत आहे.
फोटो: वाळूपासून साकारलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पोर्ट्रेट चित्रकृती
(छाया: सुमेध सावंत)

