(संगमेश्वर / एजाज पटेल)
देवरुख पंचायत समितीचे माजी सहाय्यक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक आणि आंबेड खुर्द येथे आयोजित प्रभाग समिती सभांमध्ये त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीची दखल घेत लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ग्रामस्थांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
आंबेड बुद्रुक येथे सन्मानपत्र देऊन गौरव
आंबेड बुद्रुक येथे झालेल्या प्रभाग समिती सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या माधवी गिते होत्या. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये माधवी भिडे यांच्या हस्ते विनोदकुमार शिंदे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या कार्याचा गौरव केला.

आंबेड खुर्द येथेही सत्कार
यानंतर आंबेड खुर्द येथील कुणबी भवनात कसबा जिल्हा परिषद गटाच्या सदस्या विशाखा कुवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रभाग समिती सभेतही शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विशाखा कुवळेकर यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
लोकाभिमुख कार्यपद्धतीची दखल
देवरुख पंचायत समितीत कार्यरत असताना विनोदकुमार शिंदे यांनी नागरिकाभिमुख प्रशासनाला प्राधान्य दिले. शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांची कामे शक्य तितक्या तत्परतेने मार्गी लावण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि गरजू घटकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी सकारात्मक भूमिका घेत अनेक कामे मार्गी लावली. तालुक्यातील विविध विकासकामे आणि शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. प्रशासकीय जबाबदारी सांभाळताना त्यांनी पदापेक्षा सेवाभावाला अधिक महत्त्व दिल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
या दोन्ही सत्कार सोहळ्यांना विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वक्त्यांनी शिंदे यांच्या कार्यकाळातील प्रामाणिकपणा, कार्यतत्परता आणि लोकाभिमुख दृष्टिकोनाचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

