(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा, किरबेटच्या विद्यार्थिनींनी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. कुमारी आरोही संदीप सुर्वे आणि कुमारी निधी अभिषेक कनावजे यांची शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत निवड झाली असून कुमारी जीविका नयन कनावजे हिनेही उत्तम गुणांसह यश मिळवले आहे.
या यशामागे मुख्याध्यापिका सुवर्णा पाटील, वर्गशिक्षक ज्ञानेश्वर मगदूम तसेच हर्षाराणी धसाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थिनींच्या यशात केंद्रप्रमुख दिव्या भाटकर, विस्तार अधिकारी नाईक आणि गटशिक्षणाधिकारी परीट यांचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन आणि प्रोत्साहनही महत्त्वाचे ठरल्याचे शाळेतर्फे सांगण्यात आले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सचिन अंकुशराव आणि विद्यमान अध्यक्षा संगीता सुर्वे यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक प्रोत्साहन मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल त्यांचे पालक, मार्गदर्शक शिक्षक आणि शाळेचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून किरबेट केंद्राच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

