(संगमेश्वर / एजाज पटेल)
हागणदारीमुक्त आणि ‘निर्मल ग्राम’ म्हणून ओळख असलेल्या फुणगूस गावातच सार्वजनिक शौचालयाचा अभाव असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. खाडीभागातील मध्यवर्ती बाजारपेठ, आठवडा बाजार, बँक, तलाठी कार्यालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे हे ठिकाण सुमारे २० ते २५ गावांसाठी प्रमुख केंद्र बनले आहे. त्यामुळे येथे दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते.
संगमेश्वर व रत्नागिरी येथून एसटी महामंडळाच्या नियमित बससेवा फुणगूसपर्यंत उपलब्ध असल्याने परिसरातील अनेक गावांतील नागरिक येथे ये-जा करतात. मात्र, एवढ्या महत्त्वाच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची सुविधा नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावाला हागणदारीमुक्त घोषित करण्यात आले असले, तरी सार्वजनिक ठिकाणी आवश्यक स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने या घोषणेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आठवडा बाजाराच्या दिवशी परिस्थिती अधिक गंभीर बनते. दूरवरून आलेल्या नागरिकांना उघड्यावर जाण्याची वेळ येत असून त्यामुळे स्वच्छता आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
शासनाने वैयक्तिक शौचालयांबरोबरच सार्वजनिक ठिकाणीही स्वच्छतागृहे उभारण्यावर भर दिला आहे. मात्र फुणगूसच्या मध्यवर्ती खाडीभागात ही मूलभूत सुविधा अद्याप उपलब्ध नसल्याने ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. या ठिकाणी तातडीने सार्वजनिक शौचालय उभारण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
‘निर्मल ग्राम’चा फलक फक्त दिखावा?
फुणगूस ग्रामपंचायतीच्या इमारतीवर दिमाखात झळकणारा ‘निर्मल ग्रामपंचायत’ हा फलक आणि प्रत्यक्षातील परिस्थिती यात मोठी तफावत असल्याचे चित्र समोर आले आहे. ‘निर्मल ग्राम’ ही संकल्पना केवळ घराघरांत शौचालये उभारण्यापुरती मर्यादित नसून, सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठीही स्वच्छतागृहासह आवश्यक सुविधा उपलब्ध असणे अपेक्षित आहे.
मात्र, खाडीभागातील बाजारपेठेत दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असूनही सार्वजनिक शौचालयाचा अभाव कायम आहे. त्यामुळे ‘निर्मल ग्राम’चा फलक हा प्रत्यक्ष कामगिरीपेक्षा केवळ कागदोपत्री यशाचा देखावा ठरत असल्याची संतप्त भावना नागरिक व्यक्त करत आहेत. सार्वजनिक शौचालयाची तातडीने उभारणी होईपर्यंत या फलकामागील वास्तव बदलणार नसल्याचेही ग्रामस्थांचे मत आहे.

