(मुंबई)
देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा मोठा परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग वाढत आहेत.
आज शनिवारी देशभरात पेट्रोलच्या दरात ८७ पैशांची, तर डिझेलच्या दरात ९१ पैशांची वाढ करण्यात आली. गेल्या अवघ्या १० दिवसांतील ही तिसरी मोठी दरवाढ ठरली आहे. त्यामुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होण्याची चिन्हे आहेत.
१० दिवसांत तब्बल ५ रुपयांची वाढ
१६ मे रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थेट ३ रुपयांची मोठी वाढ केली होती. त्यानंतर १९ मे रोजी पुन्हा ९० पैशांची वाढ जाहीर करण्यात आली. आजच्या ताज्या वाढीनंतर गेल्या १० दिवसांत इंधनाचे दर एकूण ५ रुपयांनी वाढले आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नका; केंद्र सरकारचे आवाहन
पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात इंधन तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने नागरिकांना स्पष्ट आवाहन केले आहे.
मंत्रालयाच्या निवेदनानुसार, देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी घाबरून जाऊन अनावश्यक इंधन साठवणूक करू नये. काही ठिकाणी निर्माण झालेला तात्पुरता ताण दूर करण्यासाठी तेल कंपन्यांकडून सतत समन्वय आणि देखरेख सुरू असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले.
महत्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे नवे दर (प्रति लिटर)
शहर पेट्रोलचे नवे दर (बदल) डिझेलचे नवे दर (बदल)
मुंबई ₹ १०७.५६ (+०.८७) ₹ ९४.०५ (+०.९१)
दिल्ली ₹ ९९.५१ (+०.८७) ₹ ९२.४९ (+०.९१)
कोलकाता ₹ ११०.५७ (+०.८७) ₹ ९६.०४ (+०.९१)
चेन्नई ₹ १०४.५४ (+०.८७) ₹ ९६.१६ (+०.९१)
गुरुग्राम ₹ १००.३८ (+०.८७) ₹ ९२.९२ (+०.९१)
नोएडा ₹ ९८.७८ (+०.८७) ₹ ९३.१२ (+०.९१)

