(रत्नागिरी)
रत्नागिरी विमानतळाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले जात असून, भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) यांच्यात उदया रविवारी (दि. ५ जुलै) सामंजस्य करार (MoU) करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता रत्नागिरीतील टीआरपी परिसरातील हॉटेल सावंत पॅलेस हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तसेच गृह (शहरे), महसूल, ग्रामीण विकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम आणि जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
यावेळी खासदार नारायण राणे, सुनील तटकरे, विधानपरिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, प्रमोद जठार, आमदार शेखर निकम, भास्कर जाधव, किरण सामंत, तसेच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, भारतीय तटरक्षक दलाचे कमांडिंग ऑफिसर कुणाल सी. नाईक, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि पोलीस अधीक्षक नितीन बगाटे उपस्थित राहणार आहेत.
भारतीय तटरक्षक दल आणि MADC यांच्यात होणाऱ्या या सामंजस्य करारामुळे रत्नागिरी विमानतळाच्या विकासाला गती मिळण्याबरोबरच नागरी विमान वाहतूक, किनारपट्टी सुरक्षा आणि पर्यटन क्षेत्रालाही मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अधीक्षक अभियंता मंगेश कुलकर्णी यांनी या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

