(रत्नागिरी / प्रतिनिधी)
अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेला अधिक बळ देत रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या सुमारे ८९ लाख ७२ हजार रुपयांच्या अंमली पदार्थांचा आज (शनिवारी) तळोजा (नवी मुंबई) येथे नियमानुसार नाश केला. न्यायालयाच्या आदेशानंतर आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मंजुरीने ही कारवाई करण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या निर्देशानुसार रत्नागिरी जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या ड्रग्ज डिस्पोजल समितीच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत असून, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) श्रीमती राधिका फडके हे समितीचे सदस्य आहेत. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे आणि त्यांच्या पथकाने सन २०१९ ते २०२६ या कालावधीत एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल झालेल्या ११ गुन्ह्यांतील जप्त मुद्देमाल नष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
या कारवाईमध्ये सुमारे १० किलो ४९ ग्रॅम गांजा, ९ किलो ७८ ग्रॅम गांजाची रोपे, ९२६ ग्रॅम चरस आणि २० किलो ५३ ग्रॅम कोकेन (युरिया) असा एकूण ८९ लाख ७२ हजार ५ रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. न्यायालयाची परवानगी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर हा मुद्देमाल सुरक्षितपणे मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड (एमडब्ल्यूएमएल), तळोजा, नवी मुंबई येथे नेण्यात आला. तेथे पर्यावरणीय निकषांचे पालन करत इन्सिनरेशन (जाळण्याच्या) पद्धतीने अंमली पदार्थांचा नाश करण्यात आला. अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्याबरोबरच जप्त मुद्देमालाची सुरक्षित आणि कायदेशीर विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने रत्नागिरी पोलिसांनी ही महत्त्वपूर्ण कारवाई यशस्वीपणे पूर्ण केली असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

