(मुंबई / वार्ताहर)
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि सहकारी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित ‘सहकार गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळ्यात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सहकार गौरव पुरस्कार-२०२६’ प्रदान करण्यात आला.
नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सहकार चळवळीच्या विकासासाठी दिलेले मोलाचे योगदान, प्रभावी नेतृत्व, समर्पित कार्य आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पुरस्कार निवड समितीने ॲड. दीपक पटवर्धन यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड केली.
यावर्षी वैयक्तिक स्तरावर महाराष्ट्रातून केवळ चार मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये ‘सहकार महर्षी’ पुरस्काराने विद्याधर अनासकर, ‘सहकार रत्न’ पुरस्काराने रेवती पैठणकर, ‘सहकार भूषण’ पुरस्काराने आमदार विनय कोरे आणि ‘सहकार गौरव’ पुरस्काराने ॲड. दीपक पटवर्धन यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मनोगत व्यक्त करताना, “सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे ॲड. दीपक पटवर्धन हे माझ्या मतदारसंघातील असल्याचा मला सार्थ अभिमान आहे,” असे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करत, “सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा हा गौरव असून, त्यांच्या विधायक कामांना शासनाचे नेहमीच सहकार्य राहील,” असे प्रतिपादन केले.
या समारंभाला राज्यभरातील सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

