(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे-अंबुवाडी (अंबु बंदर) समुद्रकिनारी पुन्हा एकदा जखमी अवस्थेतील एका समुद्री कासवाला स्थानिक कासवमित्र आणि वनमित्रांच्या तत्परतेमुळे नवजीवन मिळाले. वेळेवर प्रथमोपचार करून या कासवाला सुरक्षितपणे पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. या घटनेनंतर अंबुवाडी किनाऱ्यावर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कासवांचे आगमन होत असल्याने या परिसराला शासनाने ‘कासवांचे माहेरघर’ म्हणून अधिकृत दर्जा देऊन संवर्धनासाठी विशेष संरक्षण द्यावे, अशी मागणी ग्रुप ग्रामपंचायत नांदिवडेचे माजी सरपंच गुरुनाथ सुर्वे यांनी केली आहे.
स्थानिक कासवमित्र सागर सुर्वे यांना अंबुवाडी समुद्रकिनारी एक समुद्री कासव जखमी अवस्थेत आढळले. तपासणीदरम्यान कासवाचा पुढील उजवा पाय गंभीररीत्या जखमी होऊन तुटल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ वनमित्र किरण सर यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कासवावर आवश्यक प्रथमोपचार करण्यात आले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर कासवाला सुरक्षितपणे पुन्हा समुद्रात सोडण्यात आले.
अंबुवाडी समुद्रकिनारा हा कोकण किनारपट्टीवरील जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दक्षिण दिशेला असलेला हा किनारा नैसर्गिकदृष्ट्या सुरक्षित असल्याने दक्षिणेकडून येणाऱ्या समुद्री प्रवाहाबरोबर अनेक कासवे येथे अंडी घालण्यासाठी आणि निवाऱ्यासाठी येतात. दरवर्षी या किनाऱ्यावर कासवांची अंडी आढळतात आणि त्यातून बाहेर पडलेली पिल्ले सुखरूप समुद्रात परत जात असल्याचे स्थानिकांचे निरीक्षण आहे.
याबाबत बोलताना माजी सरपंच गुरुनाथ सुर्वे म्हणाले, “अंबुवाडी किनारा हा नैसर्गिकदृष्ट्या सुरक्षित असून पूर्वापार मासेमारीसाठीही प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर समुद्री कासवांचे आगमन होते. या दुर्मिळ सागरी जीवांचे संवर्धन आणि किनाऱ्याचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेता शासनाने अंबुवाडी समुद्रकिनाऱ्याला ‘कासवांचे माहेरघर’ म्हणून अधिकृत दर्जा देऊन संरक्षणात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात.”
स्थानिक नागरिक, कासवमित्र आणि पर्यावरणप्रेमींच्या मते, अंबुवाडी किनाऱ्याला अधिकृत संरक्षणाचा दर्जा मिळाल्यास समुद्री कासवांचे संवर्धन, त्यांच्या अंडी घालण्याच्या नैसर्गिक अधिवासाचे जतन आणि किनारपट्टीच्या जैवविविधतेचे संरक्षण करण्यास मोठी मदत होणार आहे.

