(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी शहरातील पर्यटकांनी नेहमीच गजबजलेल्या मांडवी परिसरात एका भटक्या गायीने गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अक्षरशः धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पांढऱ्या रंगाची व टोकदार शिंगे असलेली ही गाय रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांवर अचानक हल्ला करत असल्याने परिसरात सुरक्षितपणे वावरणेही कठीण झाले आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, ही गाय लहान मुले, महिला, पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिक अशा कोणालाही लक्ष्य करत असून, रस्त्यावर अचानक धावत येऊन धडक देत जखमी करते. गेल्या तीन ते चार महिन्यांत या गायीच्या हल्ल्यात तब्बल ८ ते १० जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
काही दिवसांपूर्वी मांडवी परिसरात फिरण्यासाठी आलेला एक पर्यटकही या गायीच्या हल्ल्यात जखमी झाला होता. तसेच काही नागरिकांना गंभीर दुखापती, फ्रॅक्चर झाल्याने रुग्णालयात दाखल व्हावे लागले असून, त्यांना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला आहे.
या प्रकारामुळे मांडवी परिसरातील नागरिक आणि पर्यटकही धास्तावले आहेत. त्यामुळे या भटक्या गायीचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि नगरपरिषद प्रशासनाने त्वरित पुढाकार घ्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
वेळीच उपाययोजना करण्यात आली नाही, तर भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना किंवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

