(राजापूर / रत्नागिरी प्रतिनिधी)
ऐतिहासिक घेरा यशवंतगडाच्या दुरुस्तीसाठी सुमारे आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून मोठ्या आशेने सुरू करण्यात आलेल्या कामांवर यावर्षीच्या पहिल्याच पावसात नवीन बांधकामाचा भाग कोसळल्याने गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, संबंधित कामाच्या दर्जाबाबत आणि जबाबदाऱ्यांविषयी प्रशासनाकडे प्रश्नांचा भडिमार सुरु आहे.
साखरी नाटे, नाटे पंचक्रोशीतील या ऐतिहासिक किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी मंजूर झाला होता. कामात चिरा, वाळू आणि चुन्याचा वापर करण्यात आला. मात्र अवघ्या काही महिन्यांतच हे बांधकाम पहिल्याच पावसात उध्वस्त होणे हे संबंधित विभागांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले आहे. घटनेनंतर काही कालावधीत पुरातत्व विभाग, ठेकेदार, आणि अन्य संबंधित अधिकारी यांनी घटनास्थळी पाहणी केली. मात्र, आजतागायत कोसळलेले बांधकाम नेमके का कोसळले, त्यास जबाबदार कोण, आणि कामात कोणते मटेरियल वापरण्यात आले होते याचा खुलासा अद्याप झालेला नाही.
शिवप्रेमी आणि नागरिक यांच्यामधून काही महत्त्वाचे प्रश्न सातत्याने उपस्थित केले जात आहेत. या कामासाठी वापरलेले चिरे, वाळू, आणि चुना यांची गुणनियंत्रण तपासणी झाली होती का? चिरा कोणत्या खाण व्यावसायिकांकडून खरेदी करण्यात आले होते? पुरातत्व संवर्धनाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या तांत्रिक निकषांचे पालन झाले होते का? गडांच्या दुरुस्तीतील अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना यात सहभागी करण्यात आले होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्यापही संबंधित विभागांकडून मिळालेली नाहीत. कामाची गुणवत्ता, देखरेख, ठेकेदाराची पात्रता आणि पुरातत्व विभागाच्या जबाबदारीबाबत जनतेमध्ये नाराजी असून जवाबदारी निश्चित होण्याऐवजी ही बाब दुर्लक्षित केली जात आहे, असा आरोपही होऊ लागला आहे.
पुन्हा काम सुरू, पण विश्वास डळमळीत
दरम्यान, कोसळलेल्या भागाचे पुन्हा काम सुरू झाले आहे, ही बाब जनतेसाठी काहीशी दिलासादायक असली तरी पूर्वीच्या त्रुटींची पुनरावृत्ती टाळली जाईल का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. स्थानिकांकडून या संपूर्ण प्रक्रियेवर पारदर्शक चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई व्हावी आणि अहवाल जनतेसमोर सादर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. गडकोटांचे संवर्धन हे केवळ निधी खर्चाचे नव्हे, तर इतिहासाशी नाळ जपणारे काम असते. त्यामुळे अशा संवेदनशील कामांकडे फक्त ठेकेदारी दृष्टिकोनाने नव्हे, तर पुरातत्वीय आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन जबाबदारीने पाहण्याची गरज असल्याचे जाणकारांचे मत आहे.