(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील प्रतिष्ठित नागरिक दत्तात्रय जनार्दन उर्फ ‘आप्पा’ केळकर यांचे शुक्रवारी (दि. ३ जुलै) रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मालगुंडसह गणपतीपुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दत्तात्रय केळकर हे संपूर्ण मालगुंड गावात ‘आप्पा’ या नावाने परिचित होते. गेली अनेक वर्षे ते मालगुंड येथील स. गो. केळकर अँड सन्स येथे कार्यरत होते. ते उत्कृष्ट आचारी म्हणूनही सर्वपरिचित होते. पत्नी सौ. दीपाली केळकर यांच्यासह त्यांनी अनेक ठिकाणी केटरिंग सेवा दिली. त्यांच्या हातच्या रुचकर आणि स्वादिष्ट भोजनाने अनेकांची मने जिंकली होती.
विशेष म्हणजे, जिलेबी बनविण्यात त्यांचा हातखंडा होता. राष्ट्रीय सणांच्या दिवशी त्यांनी तयार केलेल्या जिलेबीला मालगुंड, गणपतीपुळे आणि परिसरात विशेष मागणी असायची. त्यांच्या पाककलेची चव अनेकांच्या कायम स्मरणात राहील.
आप्पा केळकर हे उत्तम रंगकर्मीही होते. गावातील श्रीराम जन्मोत्सव तसेच सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त सादर होणाऱ्या नाटकांमध्ये त्यांनी अनेक वर्षे आपल्या दमदार अभिनयाने रसिकांची मने जिंकली. त्यांच्या अभिनयाची आजही गावकऱ्यांमध्ये आवर्जून चर्चा केली जाते.
अत्यंत नम्र, मनमिळावू, ऋजू स्वभावाचे आणि चेहऱ्यावर कायम प्रसन्न हास्य असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. सर्वांशी आपुलकीने वागणाऱ्या ‘आप्पा’ यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, वडील, चार मुली, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेस राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह मालगुंड, गणपतीपुळे, निवेंडी, वरवडे आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

