(संगमेश्वर)
तालुक्यातील वांझोळे गावची सुवर्णकन्या आणि राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती खो-खो खेळाडू तेजस्विनी सनगले हिचे कोल्हापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचार सुरू असतानाच बुधवारी रात्री तिची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
तेजस्विनी सनगले ही लहान वयातच आपल्या खेळाने चमकलेली एक प्रतिभावान खेळाडू होती. वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी भुवनेश्वर (ओडिशा) येथे झालेल्या १४ वर्षांखालील राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती. त्या स्पर्धेत तिने उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतून राष्ट्रीय स्तरावर पोहोचणारी ती सर्वात लहान खेळाडू ठरली होती.
गेल्या काही वर्षांत वांझोळे गावाने खो-खो क्षेत्रात विशेष ओळख निर्माण केली असून अनेक राज्य आणि राष्ट्रीय खेळाडू येथे तयार झाले आहेत. या परंपरेत तेजस्विनी ही एक आघाडीची आणि आशादायी खेळाडू मानली जात होती. उंचीने लहान असली तरी मैदानावर तिची चपळता, वेग आणि जिद्द यामुळे ती नेहमीच लक्षवेधी ठरत होती.
अनेक स्पर्धांमध्ये तिने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर संघाला विजय मिळवून दिला होता. खो-खोच्या मैदानावर जिद्दीने लढणारी तेजस्विनी आयुष्याच्या लढाईत मात्र हरली, ही बाब सर्वांच्या मनाला चटका लावून गेली आहे.
तेजस्विनीच्या अकाली निधनामुळे सनगले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून वांझोळे गावासह संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. रत्नागिरी खो-खो परिवारासाठी ही मोठी आणि न भरून निघणारी हानी मानली जात आहे.

