(देवरूख / प्रतिनिधी)
देवरूख येथील प्रसिद्ध उद्योजक व गंगा माता ट्रान्स्पोर्टचे मालक हरहुन्नरी व्यक्तीमत्व प्रसन्न शरद सार्दळ( 56) यांचे दुःखद निधन झाले.
देवरुख शहरातील हरहुन्नरी व्यक्तीमत्व प्रसन्न सार्दळ यांनी सुमारे २० वर्षापुर्वी ट्रान्स्पोर्ट व्यवसाय सुरू करुन अनेक जिल्ह्यात आपले जाळे घट्टपणे विस्तारले. तसेच तालुक्यातील अनेकांना या व्यवसायात आणून स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न केले. आपल्या या व्यावसायिकांना विठ्ठलाच्या वारीला जाते यावे म्हणून माऊली ग्रुपची स्थापना करून गेले १० वर्ष या ग्रुपचे ३५ ते ४० सदस्य पंढरपूरच्या वारीसह विविध ठिकाणी देवदर्शनाला जात असत. व्यवसायधंद्यात आलेल्या आपल्या सहकाऱ्यांना पैशातून बचत कशी करावी याचे महत्त्व पटवू दिले.
उत्कृष्ट कबड्डीपटू असलेले प्रसन्न यांनी सोळजाई क्रीडा मंडळ देवरुख चे नाव जिल्हा पातळीवर नेणेसाठी व कबड्डीपटू घडविण्यासाठी मोठे योगदान दिले. त्याचबरोबरीने क्रिकेट व बैलगाडा शर्यत हा छंद होता. बैलगाडा शर्यत वरील बंदी उठावी म्हणून त्यांनी सतत पाठपुरावा केला होता. बंदी उठल्यावर प्रसन्न यांनी माऊली गृपच्या माध्यमातून देवरूख-साडवली येथे भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन करुन स्पर्धा सर्वांबरोबर घेत यशस्वी केली.
देवरूखची ग्रामदैवता सोळजाई मंदिराच्या जिर्णोद्धार करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. अशा या हरहुन्नरी व्यक्तीमत्व असलेल्या योद्धाला ८ दिवसांपुर्वी ब्रेन स्ट्रोक आल्याने मुंबईतील लिलाव ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारात दरम्यान आज सायंकाळी ४.३० चे सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रसन्न हे शिवसेनेचे जेष्ठ नेते व माजी मंत्री गजानन कीर्तिकर यांचे भाचे तर राष्ट्रीय काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष शंकर शेट्ये यांचे जावई होत. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि 1 रोजी सकाळी 9वा. क्रांती नगर देवरूख येथील निवासस्थान येथून निघणार आहे.