(रत्नागिरी)
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), रत्नागिरी यांच्या वतीने राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP-2020) अंतर्गत इयत्ता तिसरी आणि चौथीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे करण्यात आले. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील ११२ शिक्षक, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले.
३० जून रोजी झालेल्या उद्घाटन समारंभात मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनाचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रशिक्षणाचा शुभारंभ झाला. यावेळी वरिष्ठ अधिव्याख्याता सौ. दीपा सावंत, अधिव्याख्याता सौ. सीमा इंगळे, विषयतज्ज्ञ श्रीमती देवयानी पवार आणि श्रीमती श्वेता कवितके यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनपर भाषणात डॉ. चौधरी यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत ज्ञान, कौशल्य आणि अनुभवाधारित शिक्षणपद्धतीचे महत्त्व अधोरेखित केले. विकसित भारताच्या निर्मितीसाठी आधुनिक शिक्षण प्रणाली आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रशिक्षणात सुनीता राणे, समृद्धी गोनबरे, चित्रा ठाकूर, शैलेश निकम, शिवप्रसाद गडमवार, विजय आखाडे आणि समीर काबदुले यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. नवीन अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, अध्यापनातील आधुनिक पद्धती आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षण या विषयांवर सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव यांनी परिषद दालन, वर्गखोल्या, प्रशिक्षणार्थींसाठी निवास व्यवस्था तसेच इतर आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. काही प्रशिक्षणार्थींची निवास व्यवस्था मत्स्य महाविद्यालय, शिरगाव येथे करण्यात आली होती.
या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाची सखोल माहिती मिळून अध्यापन अधिक प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होणार आहे. तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध संस्थांमधील समन्वय अधिक बळकट होऊन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यास या प्रशिक्षणाचा महत्त्वपूर्ण हातभार लागणार आहे.

