(रत्नागिरी)
श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्ट व सर्वोदय छात्रालयाचा इतिहास पाहता संस्थेने खूप चांगले काम समाजात सुरू ठेवले आहेत. छात्रालयात विद्यार्थी कसे घडले, याची माहिती मला समजली. इथला विद्यार्थी चांगली सामाजिक मूल्य घेऊन, चांगले संस्कार घेऊनच पुढे जात आहे. त्यामुळे हे विद्यार्थी मोठ्या पदावर आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष व नगरपालिका म्हणून ट्रस्टला सर्वतोपरी मदत करू. आपण हाक माराल तेव्हा धावून येऊ, अशी ग्वाही नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे यांनी दिली.
ट्रस्ट संचलित सर्वोदय छात्रालयाचा २१ वा छात्रमित्र मेळावा आज छात्रालयाच्या सभागृहात झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी नूतन नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे, स्थानिक नगरसेवक राजेश तोडणकर व सौ. मानसी करमरकर यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन हरिश्चंद्र गीते, विश्वस्त पांडुरंग पेठे आणि सदस्य वीणा काजरेकर यांनी ट्रस्टतर्फे सन्मान केला.
याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. संदीप ढवळ यांनी सांगितले की, पू. अप्पासाहेब पटवर्धन, बाळासाहेब खेर व मोरोपंत तथा तात्या जोशी, शामराव तथा अण्णा पेजे आदी महनीय व्यक्तींच्या पुण्याईचा वारसा छात्रालयाला लाभला आहे. ट्रस्टच्या रत्नागिरी शहर व परिसरात जागा आहे. त्यावर सध्या कुळ आहेत. त्यांच्याशी बोलणी झालेली आहेत. ट्रस्टमार्फत या सर्व जागा विकसित करून तेथे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी ट्रस्टने आर्किटेक्चरची नेमणूक केली आहे. त्यासाठी नगरपालिका व नगराध्यक्ष म्हणून मदत करावी. स्थानिक नगरसेवकांची मदतही संस्थेला नेहमी मिळत असते.
सरस्वती पूजन व संस्थापक बाळासाहेब खेर यांच्या पुतळ्याचे पूजन करून आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. या प्रसंगी नगरसेविका मानसी करमरकर, राजेश तोडणकर, ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. संदीप ढवळ, माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गीते, व्यवस्था समितीचे अध्यक्ष गजानन चाळके, विश्वस्त पांडुरंग पेठे, बाळकृष्ण शेलार, सर्वोदय छात्रालय छात्र समितीचे अध्यक्ष अरुण जाधव आदी उपस्थित होते.
गुरुजनांच्या हस्ते सत्कार
नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे म्हणाल्या की, यमुनाबाई खेर ट्रस्टचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गीते तसेच माजी प्राध्यापिका सौ. जयश्री बर्वे, प्रा. बीना कळंबटे या माझ्या गुरुजन आहेत. गीते सरांच्या हस्ते सत्कार होणे हे भाग्याचे असून गुरुजनांनी लागणारे मार्गदर्शनही करावे. गुरुंचे संस्कार घेऊन पुढे आलो त्यांच्या हस्ते सत्कार झाला.

