( मुंबई )
अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरण प्रस्तावाविरोधात मुंबईतील आझाद मैदानात मोठे आंदोलन झाले. अ ब क ड उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित या महामोर्चात राज्यभरातून हजारो कार्यकर्ते सहभागी झाले. आनंदराज आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा आझाद मैदानातून विधानभवनाकडे धडकला.
भरपावसात झालेल्या या आंदोलनामुळे परिसर घोषणांनी दुमदुमून गेला. आंदोलकांनी उपवर्गीकरणाचा प्रस्ताव तत्काळ रद्द करावा, अशी ठाम मागणी केली. शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर करून न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करून सर्व समाजघटकांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली.
आंदोलनादरम्यान बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी शासनावर तीव्र टीका करत, समाजाच्या एकजुटीला दुर्लक्षित करून कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असा इशारा दिला. त्यांनी पुढील काळात राज्यभर ग्रामपंचायत ते महानगरपालिका स्तरावरही आंदोलन तीव्र करण्याचे आवाहन केले.
भीमराव आंबेडकर यांनीही उपवर्गीकरणाला विरोध दर्शवत एकजुटीची गरज अधोरेखित केली. विविध वक्त्यांनी आरक्षण धोरणात कोणताही बदल करताना सर्व संबंधित घटकांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती विनोद मोरे यांनी आरक्षण संरक्षणासाठी एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन केले. इतर मान्यवरांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सरकारने संभ्रम निर्माण होईल असे निर्णय टाळावेत, अशी मागणी केली.
मोर्चाच्या शेवटी शिष्टमंडळाने सरकारकडे निवेदन सादर केले. पुढील निर्णय येईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देत, भरपावसात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानत आंदोलनाची सांगता करण्यात आली.

