(मुंबई)
राज्यातील शिक्षक पदांबाबत महत्त्वाची माहिती प्रथमच सार्वजनिक करण्यात आली आहे. माध्यमिक शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 4 लाख 94 हजार 682 शिक्षक पदांना संचमान्यता देण्यात आली आहे. तर 3,606 पदे नामंजूर करण्यात आली असून 4,315 पदांची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. ही सर्व माहिती माध्यमिक शिक्षण संचालकांनी 4 मार्च रोजी आदेश काढत सरकारी Shalarth Portal वर सर्वसामान्यांसाठी खुली केली आहे.
21 वर्षांनंतर माहिती सार्वजनिक
Right to Information Act, 2005 नुसार संचमान्यता संबंधित माहिती सार्वजनिक करणे अपेक्षित होते. मात्र तब्बल 21 वर्षांनंतर शिक्षण विभागाने मंजूर आणि नामंजूर शिक्षक पदांची अद्ययावत माहिती शालार्थ पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. या निर्णयाचे काही शिक्षक संघटनांनी स्वागत केले असले तरी काही संघटनांनी नाराजीही व्यक्त केली आहे.
राज्यातील शिक्षक पदांची स्थिती
शिक्षण विभागाच्या माहितीनुसार राज्यात एकूण 5,10,486 शिक्षक पदे आहेत. त्यापैकी 4,94,682 पदांना संचमान्यता देण्यात आली आहे. याशिवाय 4,394 पदांची अधिकृत जुळणी (मॅपिंग) बाकी असून 7,937 पदांची जुळणीसंबंधित माहिती वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आली आहे.
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना मुख्याध्यापक संघटनेचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले यांनी ही माहिती सार्वजनिक करणे स्वागतार्ह असल्याचे सांगितले. तर पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे यांनी ही माहिती गोपनीय स्वरूपाची असल्याचे सांगत निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे.
‘मॅपिंग’मुळे अतिरिक्त पदे नामंजूर
शिक्षण विभागाच्या नियमानुसार एखाद्या शाळेत मंजूर पदांची संख्या ठरलेली असते. उदाहरणार्थ एखाद्या शाळेला 10 पदांची मंजुरी असेल आणि प्रत्यक्षात शिक्षकांची संख्या जास्त असेल, तर जुळणी (मॅपिंग) प्रक्रियेदरम्यान अतिरिक्त पदे नामंजूर केली जातात.

