(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवाशाभिमुख करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने रेल्वे कायद्यात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. १ जुलै २०२६ पासून लागू झालेल्या नव्या तरतुदींनुसार विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवरील किमान दंड दुप्पट करण्यात आला असून, सहप्रवाशांना त्रास देणे, महिलांसाठी राखीव डब्यात बेकायदेशीर प्रवेश करणे किंवा दुसऱ्याच्या तिकिटावर प्रवास करणे यांसारख्या प्रकारांवरही अधिक कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.
‘जन विश्वास कायदा-२०२६’ अंतर्गत करण्यात आलेल्या सुधारणांमुळे रेल्वे प्रशासनाला किरकोळ स्वरूपाच्या नियमभंगांवर अधिक प्रभावी आणि तातडीने कारवाई करता येणार आहे. यामुळे रेल्वेतील शिस्त राखण्यासोबतच न्यायालयांवरील ताणही कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नव्या नियमांनुसार, विनातिकीट प्रवास करताना किंवा आधीच वापरलेले तिकीट पुन्हा वापरताना आढळल्यास किमान ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. यापूर्वी हा दंड २५० रुपये होता. तसेच दुसऱ्या व्यक्तीच्या तिकिटावर प्रवास करणाऱ्यांनाही ५०० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
रेल्वे स्थानक किंवा रेल्वे डब्यात सहप्रवाशांना त्रास देणे, अश्लील वर्तन करणे, शिवीगाळ करणे अथवा गोंधळ घालणे यांसारख्या प्रकारांवरही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकरणांमध्ये दंड, तिकीट जप्ती किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार सहा महिन्यांपर्यंतच्या कारावासाची शिक्षाही होऊ शकते. महिलांसाठी राखीव डब्यात विनापरवानगी प्रवेश करणाऱ्यांवर २,५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार असून, रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) अशा प्रवाशांना तातडीने डब्यातून बाहेर काढण्याची कारवाई करणार आहे. दंड न भरल्यास न्यायालयाकडून ५,००० रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
दरम्यान, कोकण रेल्वे प्रशासनाने विनातिकीट प्रवाशांविरोधातील मोहीम आणखी तीव्र केली आहे. जानेवारी ते मे २०२६ या पाच महिन्यांच्या कालावधीत ४,७९८ विशेष तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या. या मोहिमांमध्ये २ लाख २८ हजार ८०३ अनधिकृत प्रवासी आढळून आले असून त्यांच्याकडून सुमारे १४ कोटी रुपयांचा दंड आणि भाडे वसूल करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
रेल्वे मंत्रालयाने सर्व विभागांना नव्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून, प्रवाशांनी वैध तिकीट काढूनच प्रवास करावा, तसेच रेल्वेतील शिस्त आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नव्या तरतुदींमुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित आणि जबाबदार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

