( हिंगोली )
वसमत तालुक्यातील मौजे रांजोणा येथे माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतीतील कामावरून झालेल्या किरकोळ वादातून 23 वर्षीय तरुणाने आपल्या 25 वर्षीय सख्ख्या मोठ्या भावाची कु-हाडीने निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नवनाथ नामदेव सावळे असे मृत तरुणाचे नाव असून, आरोपी धाकटा भाऊ गजानन सावळे याला पोलिसांनी अटक केली आहे. हिंगोली पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे अवघ्या दोन तासांत या खुनाचा छडा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, 15 जानेवारी रोजी पहाटे रांजोणा शिवारातील नामदेव सावळे यांच्या शेत आखाड्यावर नवनाथ सावळे याचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. डोक्यात तीक्ष्ण हत्याराने घाव घालण्यात आल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक नीलाभ रोहन, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, डीवायएसपी राजकुमार केंद्रे यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला.
सुरुवातीला हा खून कोणी केला, याचा कोणताही ठोस सुगावा लागत नव्हता. मात्र, घटनास्थळाचा सखोल पंचनामा करताना पोलिसांना आडोशाला लपवलेली रक्ताने माखलेली कु-हाड आढळून आली. त्यामुळे तपासाला वेग आला.
तपासादरम्यान पोलिस निरीक्षक संग्राम जाधव आणि त्यांच्या पथकाला मृताचा धाकटा भाऊ गजानन सावळे याच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्या. तो पोलिसांसमोर सर्वसामान्य वागण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
शेतीच्या वादातून संतापात खून
आरोपी गजाननने दिलेल्या माहितीनुसार, शेतातील काम आणि घरगुती कारणांवरून दोघा भावांमध्ये वारंवार वाद होत होते. 15 जानेवारीच्या मध्यरात्री संतापाच्या भरात, झोपेत असलेल्या नवनाथच्या डोक्यात कु-हाडीने वार करण्यात आला. गंभीर जखमेमुळे नवनाथचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे संपूर्ण रांजोणा परिसरात खळबळ उडाली असून, रक्ताच्या नात्यालाच काळिमा फासणाऱ्या या घटनेवर नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

