(नवी दिल्ली)
अयोध्येतील राम मंदिरातील देणगी अपहार प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) प्रथमच अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत, मंदिरातील श्रद्धा आणि पारदर्शकता अबाधित ठेवण्याचे आवाहन केले आहे.
होसबळे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर हे लाखो रामभक्तांच्या त्याग, समर्पण आणि संघर्षातून उभे राहिलेले संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. अशा पवित्र स्थळी देणगीशी संबंधित कथित गैरव्यवहार उघडकीस येणे अत्यंत वेदनादायी असून त्यामुळे रामभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
त्यांनी पुढे सांगितले की, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या विनंतीनंतर उत्तर प्रदेश सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून, तपासात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई व्हावी. या प्रकरणातील गोंधळ लवकरात लवकर संपुष्टात येईल आणि मंदिर व्यवस्थापन अधिक पारदर्शक व विश्वासार्ह पद्धतीने कार्य करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यासोबतच संघाने हिंदू समाजाला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. या घटनेचा आधार घेत हिंदू समाज किंवा धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींना यशस्वी होऊ देऊ नये, असेही होसबळे यांनी म्हटले आहे.
आठ जण अटकेत, तपासाला वेग
राम मंदिरातील देणगी अपहाराचे कथित प्रकरण ७ जून रोजी उघडकीस आले. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीच्या प्राथमिक अहवालानंतर पोलिसांनी कारवाई तीव्र केली. या प्रकरणात आतापर्यंत देणगी मोजणी प्रक्रियेशी संबंधित आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या वादानंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनीही पदाचा राजीनामा सादर केला आहे.
अटक करण्यात आलेले आठ आरोपी
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये रामशंकर यादव उर्फ टिन्नू, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, सुभाष चंद्र श्रीवास्तव, मनीष यादव, करुणेश पांडे, अविनाश शुक्ला आणि रामशंकर मिश्रा यांचा समावेश आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या सर्वांवर मंदिरातील दानपेट्या, देणगी मोजणी आणि रोकड व्यवस्थापनाशी संबंधित विविध जबाबदाऱ्या होत्या. त्यांच्यावर देणगीच्या रकमेचा कथित अपहार, मालमत्ता खरेदी आणि बेकायदेशीर संपत्ती जमवल्याचे आरोप असून, तपासादरम्यान काही आरोपींकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.

