(राजापूर / तुषार पाचलकर)
महाराष्ट्र शासन महसूल विभाग रत्नागिरी व तहसीलदार कार्यालय राजापूर यांच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आणि सेवा पंधरावडा उपक्रमांतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस (१७ सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर) या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा भाग म्हणून सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, पाचल (ता. राजापूर) येथे विद्यार्थ्यांना महत्त्वाचे दाखले वितरित करण्यात आले.
या उपक्रमातून ‘शाळा तिथे दाखला’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणत विद्यार्थ्यांना अधिवास दाखला, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला इत्यादी दाखले शाळेतच उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना दाखले मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर झाल्या. पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
दाखले वाटप श्री. अशोक सक्रे (कार्याध्यक्ष, पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ पाचल) आणि श्री. विलास सरफरे (निवासी नायब तहसीलदार, राजापूर) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रशालेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. खरात मॅडम, श्री. संजय पवार (मंडळ अधिकारी, पाचल), श्रीमती पूनम गावित (मंडळ अधिकारी, तळवडे), सहाय्यक शिक्षक व पाचल सरपंच श्री. बाबालाल फरास यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला नायब तहसीलदार श्री. विलास सरफरे, मंडळ अधिकारी श्री. संजय पवार, रायापाटण तलाठी श्री. शशिकांत कांबळे, पाचल तलाठी श्री. एल. एस. नरके, सहाय्यक शिक्षक श्री. सिद्धार्थ जाधव, श्री. मदने, पोलीस पाटील महेंद्र जाधव, तसेच प्रशालेचे शिक्षकवृंद उपस्थित होते.

