(राजापूर / तुषार पाचकर)
राज्यभर निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा मोठा फटका राजापूर तालुक्यातील पाचल परिसरासह अनेक भागांना बसत आहे. घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडला असून अनेक हॉटेल्सना तात्पुरते शटर खाली करावे लागले आहे.
पाचल परिसरात गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडरचा पुरवठा अपुरा पडत आहे. परिणामी, लहान-मोठ्या खानावळी, हॉटेल्स आणि ढाबे यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही हॉटेल चालकांनी हॉटेल व्यवसायच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशावेळी अनेकांचा चहा नाष्टा आणि जेवणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, गॅस टंचाईचा परिणाम केवळ व्यावसायिक क्षेत्रापुरता मर्यादित नसून घरगुती स्तरावरही जाणवत आहे. अनेक कुटुंबांना गॅसअभावी पुन्हा पारंपरिक चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागात लाकूडफाटा गोळा करून जेवण बनवण्याचे चित्र पुन्हा दिसू लागले आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे या गैरसोईकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित विभागाने त्वरीत उपाययोजना करावी, अन्यथा येत्या काळात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

