(राजापूर)
डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने शनिवार, १ मार्च रोजी राजापूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात व्यापक स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या उपक्रमात राजापूर व लांजा तालुक्यातील शेकडो श्रीसदस्य मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या स्वच्छता अभियानाबाबत प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांनी आज राजापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष अॅड. हुस्नबानू खलिफे यांना निवेदन सादर केले. यावेळी नगराध्यक्षांनी अभियानासाठी नगरपालिकेकडून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन दिले. या बैठकीस उपनगराध्यक्ष विनय गुरव, विरोधी गटनेते अॅड. राहुल तांबे, मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांच्यासह नगरसेवक व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना प्रतिष्ठानचे प्रतिनिधी सुरेश बाईत यांनी सांगितले की, यापूर्वी २०१६ ते २०१८ या कालावधीत राजापूर शहरात सलग तीन वर्षे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. पहिल्या वर्षी एकाच दिवसात सुमारे १६० टन, दुसऱ्या वर्षी ६० टन आणि तिसऱ्या वर्षी १७ टन कचरा संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली होती. यंदाही या अभियानाच्या माध्यमातून राजापूर शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या अभियानाअंतर्गत वैशपांयन पूल, बागकाझी मार्गे ओगलेवाडी रस्ता ते गोठण मैदान, साखळकरवाडी होळीमांड, मैदान रस्ता ते लक्ष्मीनारायण मंदिर व पाण्याची तळी परिसर, कोंढेतड चव्हाटा रस्ता ते गांगो मंदिर परिसर, कोंढेतड गणेश घाट, स्टेट बँक ते ठाकूर बेकरी रस्ता, एसटी डेपो ते बावकर हॉस्पिटल, मुन्शी नाका ते महापुरुष वरचीपेठ, शासकीय विश्रामगृह ते म्हसोबा देवस्थान शीळ, निनादेवी मंदिर ते साई मंदिर रस्ता, नगर पालिका गार्डन, भारतगॅस कार्यालय ते साईनगर कोदवली अंतर्गत रस्ते, राजापूर एसटी डेपो वर्कशॉप, स्टार प्लाझा ते गुरववाडी तसेच नदीपात्र परिसरात स्वच्छता करण्यात येणार आहे.
या सेवाकार्यात भालावली, गावडे आंबेरे, नाटे, नाणार, सागवे, खारेपाटण, कोदवली, केळवली, राजापूर, लांजा, दोनिवडे आणि बाकाळे येथील श्रीसमर्थ बैठकीतील सदस्य सहभागी होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

