(राजापूर)
मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी सायंकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. कोदवली बसस्टॉपवरून लिफ्ट मागणाऱ्या एका महिलेला कारचालकाने राजापूरऐवजी पुढे नेत लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने दाखवलेल्या धाडसामुळे तिचा बचाव झाला.
या झटापटीदरम्यान कारचालकाने महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केला, त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. जखमी महिलेला प्रथम राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेनंतर कारचालक पसार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
घटनेचा तपशील
कोदवली येथील रहिवासी रश्मी चव्हाण या गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास राजापूरला जाण्यासाठी बसस्टॉपवर उभ्या होत्या. त्यावेळी त्यांनी मुंबईकडून येणाऱ्या एका कारला लिफ्टसाठी हात दाखवला. सुरुवातीला कारचालकाने लिफ्ट दिली, मात्र राजापूरात न उतरता तो कार पुढे नेत राहिला. यावरून चव्हाण यांना संशय आला आणि त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान कारचालकाने त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी जोरदार प्रतिकार केला. झटापटीत कारचालकाने त्यांच्या डोक्यावर रॉडने वार केला. तरीही धाडस दाखवत चव्हाण यांनी महामार्गावरील मोठ्या पुलाजवळ कारचा दरवाजा उघडून उडी मारली. त्यानंतर कारचालक गाडी वळवून मुंबईच्या दिशेने फरार झाला.
स्थानिकांची मदत आणि पोलिस तपास
गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या चव्हाण यांना स्थानिक रिक्षाचालक व ग्रामस्थांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. राजापूर पोलिसांनी तत्काळ दखल घेतली असून पेट्रोल पंप व महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचे काम सुरू आहे. या कारचा प्रकार व्हॅगनआर असल्याची माहिती पुढे आली आहे.
या हल्ल्यात पीडित रश्मी चव्हाण यांच्याकडून रोख रक्कम ₹५,०००, व्हिवो कंपनीचा मोबाईल आणि त्यांच्या कानातील ४ ग्रॅम वजनाची सोन्याची बुगडी आरोपीने हिसकावून घेतली आणि घटनास्थळावरून फरार झाला. रश्मी चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार, आरोपीने एकूण ₹३३,००० किंमतीचा ऐवज चोरला आहे, ज्यात रोख रक्कम ₹५,०००, ४ ग्रॅम वजनाची सोन्याची बुगडी सुमारे ₹२५,००० किमतीची आणि ₹३,००० किमतीचा सिल्व्हर रंगाचा व्हिवो मोबाईल यांचा समावेश आहे. पोलीसांनी तातडीने गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
भरदिवसा महामार्गावर घडलेल्या या घटनेने प्रवाशांमध्ये, विशेषत: महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

