(जैतापूर / राजन लाड)
नाटे बाजारपेठेने रविवारी (शनिवार मध्यरात्र) आपल्या इतिहासातील एक भयावह रात्र अनुभवली. रात्री सुमारे १२.३० वाजता लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण इमारत आगीत भस्मसात झाली. या इमारतीतील सात दुकाने म्हणजे सात उद्योजकांचे स्वप्न आणि अनेकांचे रोजगार यांची काही तासांतच राखरांगोळी झाली. ही इमारत धाऊलवल्ली येथील राजेश दत्ताराम पावसकर यांची मालकीची होती. सुदैवाने इमारत रहिवासी नसल्यामुळे जीवितहानी टळली, मात्र लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

जळालेले गाळे आणि झालेलं नुकसान:
-
दिगंबर गिजम – उपहारगृह (संपूर्ण फर्निचर, किचन यंत्रणा खाक)
-
भीम खंडी – चायनीज फास्ट फूड सेंटर
-
प्रदीप मयेकर – टेलरिंग शॉप (मशिन्स, तयार कपडे जळाले)
-
केदार ठाकूर – कापड व प्लास्टिक वस्तू विक्री दुकान
-
प्रसाद पाखरे – फोटो स्टुडिओ (कॅमेरे, प्रिंटर, संगणक आदी साहित्य खाक)
-
निकिता गोसावी – ब्युटी पार्लर
-
नारायण गोसावी – कटलरी गोडाऊन
माणुसकीच्या जिवंत उदाहरणाचे दर्शन: युवकांचे धाडस व मदतकार्य
आगीची माहिती मिळताच सागरी पोलीस स्टेशन नाटेचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडेकर, नाईट ड्युटीवरील पोलीस कर्मचारी, तसेच अनेक ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. स्थानिक युवकांनी स्वतःच्या वाहनातून पाण्याचा तातडीने पुरवठा केला.
साखरी नाटे व नाटे गावातील युवकांनी मोठ्या धाडसाने जीव धोक्यात घालून आगीवर नियंत्रण मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी आगीच्या धुरात लपलेल्या सात ते आठ गॅस सिलेंडर्स बाहेर काढले. काही सिलेंडर्स पूर्ण भरलेले होते, आणि त्यांचा स्फोट झाला असता तर संपूर्ण बाजारपेठ उध्वस्त झाली असती.
अग्निशामक दल (राजापूर नगरपालिका) घटनास्थळी रात्री २.३० वाजता दाखल झाले आणि सकाळी ४ वाजेपर्यंत आग नियंत्रणात आणण्यात आली. या संपूर्ण प्रयत्नांदरम्यान युवकांनी छपरांवर चढून, धुरात गुदमरता गुदमरता, आटोकाट प्रयत्न केले.

अपयशाच्या राखेतून आशेची पालवी: अपूर्वा ताई सामंत यांची भेट व मदतीचे आश्वासन
या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अपूर्वा ताई सामंत यांनी घटनास्थळी भेट देत, प्रत्येक प्रभावित उद्योजकाला धीर दिला. त्यांनी विशेषतः निकिता गोसावी यांच्याशी संवाद साधून तिला ब्युटी पार्लर पुन्हा उभे करण्यासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. आवश्यक साहित्य – मशिन्स, कॉस्मेटिक्स, खुर्च्या, फेशियल यंत्रणा – लवकरच पुरवण्यात येतील असे त्यांनी ठाम सांगितले. अपूर्वा ताईंनी स्थानिक प्रशासन, सामाजिक संस्था व सरकारी यंत्रणा यांच्या सहकार्याने व्यवसाय पुनरुज्जीवन, कर्ज सवलत व शासकीय योजनांच्या जोडीद्वारे व्यापक मदत देण्यावर भर देण्याचे आश्वासन दिले.
प्रसाद पाखरे (फोटो स्टुडिओ) आणि प्रदीप मयेकर (टेलरिंग शॉप) यांनाही स्थानिक व्यापारी मंडळाच्या मदतीने आर्थिक आधार देण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. व्यापारी संघटनांनी एकत्र येऊन ‘फंड रेसिंग’ मोहिम हाती घेण्याचे नियोजनही सुरू केले आहे.

एकता, धैर्य आणि माणुसकीचं दर्शन
या दुर्घटनेने नाटे परिसरात एक वेगळाच आदर्श उभा केला आहे. धर्म, जात, राजकारणाच्या सीमा बाजूला ठेवून युवकांनी एकत्र येत संकटाशी सामना केला. मुस्लिम युवकांनीही मदतीसाठी पुढाकार घेतल्यामुळे “संकटात माणुसकी हीच खरी ओळख” हे पुन्हा सिद्ध झाले.

