(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील वेतोशी गावात साक्षगंध सोहळ्याला संविधानिक मूल्यांची अनोखी जोड देत “संविधान जागर” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तेजस्वी आणि तुषार यांच्या साक्षगंध विधीनिमित्त पार पडलेल्या या उपक्रमाने सामाजिक बांधिलकी आणि प्रबोधनाचा संदेश दिला.
कार्यक्रमात भारतीय संविधानातील न्याय, समता, बंधुता आणि स्वातंत्र्य या मूलभूत मूल्यांविषयी उपस्थितांमध्ये जनजागृती करण्यात आली. संविधानाच्या विविध अंगांचा गौरवपूर्वक सन्मान करत नागरिकांनी संविधान निष्ठेची सामूहिक भावना व्यक्त केली. यावेळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे अनावरण करून त्यांच्या लोककल्याणकारी विचारांना अभिवादन करण्यात आले. तसेच नववधू-वरांसह उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. या उपक्रमातून सामाजिक ऐक्य, संविधानिक मूल्यांचा जागर आणि नव्या पिढीमध्ये लोकशाहीविषयी जागृती निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.
ग्रामीण भागात विवाह सोहळ्यांसारख्या सामाजिक कार्यक्रमांमधून संविधान जनजागृतीचा अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले. “संविधान जागर” उपक्रमामुळे साक्षगंध सोहळ्याला सामाजिक आणि वैचारिक अधिष्ठान लाभल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

