(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी गावची श्रीनवलाई देवीची पालखी शिमगोत्सवा निमित्त भक्तभेटीसाठी निघाली आहे.
मानवी जीवनात सणांची रेलचेल सर्वत्र आढळते. या साऱ्या सणांना सांस्कृतिक बैठक असते. काही खास परंपरा असतात. विविध वैशिष्ट्यांनी नटलेला कोकणचा सामाजिक व सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक म्हणजे शिमगोत्सव.
शिमगा म्हटला कि देवदेवतांच्या पालख्या आल्याच. मेर्वी गावातील जागृत देवस्थान श्रीनवलाई देवी असून हि देवी नवसाला पावत असते. त्यामुळेच हि पालखी मेर्वी गावात भक्तभेटीसाठी शिमगोत्सवाला प्रारंभ होताच निघते. या पालखीत श्रीनवलाई, पावणाई, श्रीदेव रवळनाथ या देवांच्या मूर्ती आहेत.
मेर्वी गावातील सर्व ग्रामस्थ भाविक भक्तिमय वातावरणात आनंदात मेर्वी गावच्या नवलाई देवीची पालखी घरोघरी ढोल ताशांच्या गजरात पालखी खांद्यावर घेऊन शिमगोत्सवाचा आनंद लुटत आहेत. सध्या या देवीचे दर्शन घेण्यासाठी आणि मेर्वी गावात बाहेर गावातून माहेरवाशीण खणानारळाने देवीची ओटी भरण्यासाठीच आली आहेत.
फोटो : मेर्वी गावची ग्रामदेवता श्रीनवलाई देवीची पालखी भक्तभेटीसाठी निघाली
(छाया : दिनेश पेटकर, गावखडी)