(रत्नागिरी / प्रतिनिधी)
चुलीवरील कुकर उचलत असताना अचानक चक्कर आल्याने हातातील कुकर खाली पडून त्यातील उकळती डाळ अंगावर सांडल्याने गंभीर भाजलेल्या २३ वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पावस परिसरात घडली.
लक्ष्मी हल्लेपा बुदीहल (मूळ रा. कर्नाटक, सध्या रा. बोरभाटले, नाखरे, रत्नागिरी) असे मृत तरुणीचे नाव आहे. बुधवारी, १३ मे रोजी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी या घरातील चुलीवर ठेवलेला कुकर उचलत असताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे हातातील कुकर खाली पडला आणि त्यातील गरम डाळ अंगावर उडाल्याने त्या गंभीर भाजल्या. सुरुवातीला त्यांच्यावर घरच्या घरी उपचार करण्यात आले. मात्र, जखमांचा त्रास वाढू लागल्याने त्यांना सापुचेतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाची नोंद पूर्णगड पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.

