(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर पोलीस ठाण्यामध्ये सहा महिन्यापूर्वी पदभार स्वीकारलेले आणि अल्प कालवधीत “दबंग” अधिकारी म्हणून लोकप्रिय झालेले पोलीस निरीक्षक अमित यादव यांची बदली झाली आहे. इतक्या चांगल्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली झालीच कशी इथपासून ती नेमकी कशामुळे आणि का झाली? किंबहुना त्यांच्या बदलीची ही माहिती अफवाच तर नाही ना, इथपर्यंतच्या चर्चेला तालुक्यात उधाण आले होते. मात्र, त्यांच्या बदलीची अफवा नसून बदलीबाबतचा आदेश जारी झाला आहे.
पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी 24 ऑगस्ट 2024 रोजी संगमेश्वर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता. आणि त्या दिवसापासूनच त्यांची यशस्वी कारकीर्द गाजत आहे. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसातच त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवण्यास सुरुवात केली. शिस्तीचा कारभार चालावा म्हणुन त्यांनी सहकारी पोलिसांना सोबत घेत व संगमेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावांमधील नागरिकांना विश्वास घेत अनेक हितकारक मोहिमा हाती घेतल्या होत्या. “दबंग” पोलीस अधिकारी म्हणुन जेवढी त्यांची ओळख, तेवढीच त्यांची दहशत व लोकप्रियताही होती.
पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या कामाच्या कार्यपद्धतीमुळे त्यांच्या कारकिर्दीचा आलेख उंचावत असतानाच त्यांच्या बदलीची बातमी सर्वत्र अगदी खेडेगावातील कानाकोपऱ्यापर्यंत पसरली. त्यांची बदली होऊ नये व ही बातमी म्हणजे अफवाच ठरावी, अशी अपेक्षा संगमेश्वरवासिय करत होते. मात्र, ही अफवा नसून त्यांची बदली रत्नागिरी आर्थिक गुन्हा विभागात झाल्याचे वास्तव असल्याचे समजताच नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटू लागला आहे.