(गणपतीपुळे / वैभव पवार)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) युवक संघटनेचे कोकण प्रदेश उपाध्यक्ष, रत्नागिरी येथील भीम युवा पँथरचे कार्याध्यक्ष तसेच सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्ते उमेश कदम यांचे वडील सुधाकर रामचंद्र कदम यांचे दीर्घ आजाराने २७ जून रोजी दुःखद निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते.
सुधाकर कदम हे शांत, प्रेमळ, मनमिळावू आणि कष्टाळू व्यक्तिमत्त्व म्हणून परिसरात परिचित होते. आयुष्यभर प्रामाणिक मेहनत करून त्यांनी आपल्या कुटुंबाचा संसार सांभाळला. मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवत त्यांना समाजाभिमुख आणि सन्मार्गी घडविण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
सामाजिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. वरची निवेंडी भीमनगर येथील भावकीचे चिटणीस म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. तसेच गावातील पाणीपुरवठा योजनेवर पाणी सोडण्याचे काम त्यांनी अनेक वर्षे अत्यंत प्रामाणिकपणे केले. ते वरची निवेंडी बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १८ चे ज्येष्ठ सभासद होते. समाजातील त्यांच्या कार्यामुळे त्यांना परिसरात आदराचे स्थान लाभले होते.
सुधाकर कदम यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच वरची निवेंडी येथील स्थानिक ग्रामस्थ, मुंबईस्थित भावकी तसेच विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय संस्था-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली.
दिवंगत सुधाकर कदम यांच्या स्मरणार्थ जलदान विधी, पुण्यानुमोदन व शोकसभा रविवार, ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरी आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमास नातेवाईक, मित्रपरिवार, समाजबांधव आणि हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कदम कुटुंबीय आणि निवेंडी भावकीच्या वतीने करण्यात आले आहे.

