(गावखडी / वार्ताहर)
राष्ट्रीय कृषी दिनाचे औचित्य साधत रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मेर्वी (गुरववाडी) येथे विद्यार्थ्यांसाठी भातलागवडीचा प्रत्यक्ष प्रात्यक्षिक उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शेतीचे महत्त्व, पारंपरिक भातशेतीची प्रक्रिया आणि श्रमाचे मूल्य प्रत्यक्ष अनुभवता आले.
शाळेचे मुख्याध्यापक मसरज शेख आणि सहशिक्षिका शानजा भाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शेताची मशागत, भाताच्या रोपांची तयारी आणि त्यानंतर भातलागवड अशा विविध टप्प्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. चिखलात उतरून विद्यार्थ्यांनी आनंदाने भाताची रोपे लावत कृषी संस्कृतीशी नाळ जोडण्याचा अनोखा अनुभव घेतला.
आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानप्रधान युगात मुलांना शेतीविषयी प्रत्यक्ष ज्ञान मिळावे, अन्नधान्य उत्पादनामागील शेतकऱ्यांचे कष्ट समजावेत आणि शेतीबद्दल आदर निर्माण व्हावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत उपक्रम यशस्वी केला.
शाळेने केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर विविध सहशालेय उपक्रमांमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय विविध स्पर्धांमध्ये यश मिळवत शाळेचे नाव उज्ज्वल केले असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जात आहे. शिक्षणासोबतच संस्कार, पर्यावरण संवर्धन, कृषीविषयक जाणीव आणि श्रमप्रतिष्ठा या मूल्यांची जोपासना करण्यावर शाळेचा भर आहे.
या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, माता-पालक संघ, ग्रामस्थ तसेच पालकांनी समाधान व्यक्त करत शिक्षकांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक केले. भविष्यातही विद्यार्थ्यांसाठी अशाच नाविन्यपूर्ण आणि अनुभवाधारित उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
फोटो : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मेर्वी (गुरववाडी) येथे कृषी दिनानिमित्त आयोजित उपक्रमात विद्यार्थी उत्साहाने भाताच्या रोपांची लागवड करताना.
(छायाचित्र : दिनेश पेटकर, गावखडी)

