( राजापूर )
राजापूर तालुक्यातील कोंड्ये गावात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्रीत पाच घरे फोडून सुमारे सात लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना मंगळवार, ९ जून २०२५ च्या मध्यरात्री घडली असून, परिसरात खळबळ माजली आहे.
कोंड्ये येथील शिक्षक कॉलनी, बौद्धवाडी, आणि मधलीवाडी भागातील अशोक महाडेश्वर (मुख्याध्यापक, कोंड्ये हायस्कूल), ॲड. मुरलीधर मोरे, योगेश मोरे, शशिकांत लाड, व अविनाश तावडे यांच्या घरांमध्ये चोरट्यांनी प्रवेश करून सोनं, रोख रक्कम व मौल्यवान वस्तू चोरल्या.
ग्रामस्थांनी घटनेची माहिती दिल्यानंतर राजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली असून तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात येत आहेत.
गेल्या काही काळात राजापूर परिसरात मोठी घरफोडी झालेली नव्हती, त्यामुळे या चोरीमुळे नागरिकांमध्ये चिंता पसरली आहे. पोलिसांसमोर आता या घरफोडीप्रकरणातील चोरांचा शोध घेणे आणि चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करणे हे मोठे आव्हान आहे.
राजापूर पोलीस या गुन्ह्याचा कसून तपास करत असून लवकरच चोरट्यांचा छडा लागेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.