(रत्नागिरी / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक म्हणून अनुभवी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी राजेंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शांत, संयमी आणि परिणामकारक कार्यपद्धतीसाठी ओळख असलेल्या यादव यांच्याकडे आता देवरूखच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. देवरूखचे तत्कालीन पोलीस निरीक्षक उदय झावरे यांची रायगड येथे उपविभागीय पोलीस अधिकारीपदी पदोन्नती झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यातील कार्यकाळात राजेंद्र यादव यांनी अनेक संवेदनशील आणि आव्हानात्मक घटनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावत सक्षम नेतृत्वाची छाप पाडली आहे. मुंबई गोवा आणि मिऱ्या नागपूर महामार्गावरील गंभीर अपघात असोत, गुन्ह्यांचा तपास असो किंवा निवडणुकांसारखी संवेदनशील जबाबदारी, प्रत्येक ठिकाणी त्यांनी जबाबदारीने आणि संयमाने परिस्थिती हाताळली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा आणि निवळी येथील भीषण गॅस टँकर अपघातांवेळी त्यांनी स्वतः घटनास्थळी ठाण मांडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी यंत्रणांमध्ये समन्वय साधला होता. हातखंबा येथील गॅस टँकर अपघातानंतर मध्यरात्रीपासून दुसऱ्या दिवशी सकाळी क्रेनच्या सहाय्याने टँकर हटविण्यापर्यंत ते घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण मोहिमेवर लक्ष ठेवत राहिले होते. त्यांच्या या कार्यशैलीचे सर्व स्तरांतून कौतुक झाले होते.
यादव यांनी वेश्या व्यवसायाविरोधातील कारवाई, लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकांदरम्यान शांततापूर्ण वातावरण राखण्यामध्येही प्रभावी भूमिका बजावली आहे. गुन्ह्यांच्या तपासात ते केवळ स्वतः सक्रिय राहत नाहीत, तर तपास पथकाला योग्य दिशा देत गुन्ह्यांची उकल करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रभावी मार्गदर्शन करतात, अशी त्यांची ओळख आहे. त्यांचा शांत, संयमी आणि लोकाभिमुख स्वभाव ही त्यांची आणखी एक जमेची बाजू मानली जाते. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे, कायद्याच्या चौकटीत राहून योग्य तो मार्ग काढणे आणि तक्रारींचे संवेदनशीलतेने निवारण करणे, ही त्यांची कार्यपद्धती नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरली आहे.
राजेंद्र यादव लवकरच देवरूख पोलीस ठाण्याचा अधिकृत पदभार स्वीकारणार असून, त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षम नेतृत्वाचा लाभ देवरूख परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी होईल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, उदय झावरे यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल तसेच राजेंद्र यादव यांच्या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

