( खेड / वार्ताहर )
नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षा निकालात साखरोली मोरेवाडी जिल्हा परिषद शाळेने उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. शाळेचा विद्यार्थी प्रणय प्रशांत कांबळे याने जिल्हा गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला असून राज्य गुणवत्ता यादीत १३वा क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे, राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवणारा तो रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थी ठरला आहे.
याच शाळेतील ईश्वरी सत्यवान मेटकर, स्वराज महेश मोरे, अनुश्री विलास पाचाडकर, विनय विनोद पाटील, ध्रुव उमेश मुकनाक आणि अर्णव मनेश तांबे या विद्यार्थ्यांनीही जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत ग्रामीण भागातील या शाळेचा लौकिक अधिक उंचावला आहे. एकाच शाळेतील तब्बल सात विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्याने शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक राजेश भागणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापक अनिल यादव आणि शिक्षक कृष्णा गंभीरे व अमोल सकपाळ यांचेही या यशात महत्त्वपूर्ण योगदान आहे.

या यशाबद्दल बोलताना मार्गदर्शक शिक्षक राजेश भागणे म्हणाले, “नवीन गाव, नवीन शाळा, नवीन विद्यार्थी आणि नवीन पालक असा प्रवास असतानाही सर्वांनी मनापासून सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी वर्षभर शनिवार-रविवारचीही सुट्टी न घेता सातत्याने अभ्यास केला. पालकांनीही मुलांना नियमित शाळेत पाठवून मोठी साथ दिली. विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाले. साखरोली मोरेवाडी शाळेचा विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम आल्याचा मला सार्थ अभिमान आहे.”
अत्यंत दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेने मिळवलेल्या या दैदीप्यमान यशामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रभावी साक्ष मिळाली आहे.

